मुलांच्या शाही विवाहावरून राज्यमंत्री भास्कर जाधव यांची जाहीरपणे चंपी करून राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळाच्या मुद्दय़ावर राष्ट्रवादी गंभीर असल्याचा संदेश देतानाच दुष्काळाच्या झळा बसलेल्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
दुष्काळाची तीव्रता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात जास्त आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला किंवा पवार यांच्या माढा मतदारसंघात दुष्काळाच्या झळा लोकांना आतापासूनच बसू लागल्या आहेत. सातारा, सांगली, सोलापूरसह मराठवाडय़ातील बीड, जालना, उस्मानाबाद आदी जिल्ह्य़ांमध्ये राष्ट्रवादीची चांगली ताकद आहे.
 निवडणुका वर्षांवर येऊन ठेपल्या असताना मतदारांची नाराजी राष्ट्रवादीला परवाडणारी नाही. यातूनच दुष्काळ निवारणावर राष्ट्रवादीने भर दिला आहे. दुष्काळग्रस्त जनतेच्या मनात सरकारबद्दल एक प्रकाराची चीड किंवा नाराजीची भावना आहे. सरकारी मदत मिळण्यात अडथळे येतात किंवा राजकारण केले जाते, अशा तक्रारी येऊ लागल्या आहेत. दुष्काळाचा मुद्दा व्यवस्थितपणे न हाताळल्यास पुढील निवडणुकीत त्याचा फटका बसू शकतो याचा अंदाज राष्ट्रवादीच्या नेत्यांना आला आहे. त्यातूनच पवार यांनी ‘डॅमेज कंट्रोल’ केल्याचे मानले जाते.
राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या मुलांच्या शाही विवाहाची दृश्ये बधून रात्री आपल्याला झोप येत नव्हती, असे विधान करून राष्ट्रवादी दुष्काळाबाबत किती गंभीर आहे, हे पवार यांनी दाखवून दिले. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यांनी खोटी प्रतिष्ठा आणण्यापेक्षा वेगळा मार्ग पत्करावा, असा टोकाचा टोलाही हाणला.
 राज्यमंत्री जाधव यांचा वारू चौफेर उधळला होता. त्याला लगाम लावण्याचे काम राष्ट्रवादीने केले. हे करताना दुष्काळग्रस्तांमध्ये निर्माण झालेली नाराजी पवार यांनी दूर केली.
दुष्काळाच्या मुद्दय़ावर पवार किती गंभीर आहेत हा संदेश जनतेत योग्यपणे गेला. जाधव यांची जाहीरपणे कानउघाडणी केली असली तरी त्यांना राज्यमंत्रीपदी कायम ठेवले जाईल, असे संकेत पक्षाने लगेचच दिले आहेत.  पुढील निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातून जास्त खासदार-आमदार निवडून आणण्याचे राष्ट्रवादीचे उद्दिष्ट आहे. दुष्काळ          निवारणासाठी  काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच गंभीर असल्याचे चित्र आतापासूनच राष्ट्रवादीने उभे केले आहे. याचा फायदा घेत मतदारांची सहानभूती मिळविण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत.