मरिन लाइन्सजवळील पादचारी पूल बंद; सहा महिन्यांनंतरही पाडकाम नाही

प्रसाद रावकर, मुंबई</strong>

मुंबईतील धोकादायक पादचारी पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाही, मरिन लाइन्स स्थानकाजवळील दोन धोकादायक पादचारी पूल पाडण्यासाठी पालिकेला वेळ मिळालेला नाही. स्थानकाच्या पूर्वेला महर्षी कर्वे मार्गावर असलेले दोन पादचारी पूल गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आले. मात्र, सहा महिन्यांनंतरही या पुलांचे पाडकाम होऊ शकलेले नाही. आता हिमालय पूल दुर्घटनेनंतर पालिकेला जाग आली असून पाडकामासाठी प्रशासनाने वाहतूक पोलिसांनी पत्रव्यवहार सुरू केला आहे.

मरिन लाइन्स रेल्वे स्थानकात जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी पूर्वेला महर्षी कर्वे मार्गावर दोन पादचारी पूल उभारण्यात आले होते. यापैकी एक पूल लोखंडी खांबांच्या सांगाडय़ावर बेतण्यात आला. तर दुसरा पूल सिमेंट काँक्रीटचा वापर करून उभारण्यात आला. कालौघात हे दोन्ही पूल धोकादायक बनले होते. मात्र त्याकडे पालिकेचे लक्षच नव्हते. महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने मुंबईमधील पादचारी पूल, उड्डाण पूल आणि आकाशमार्गिकांची (स्कायवॉक) संरचनात्मक तपासणी करण्याचा निर्णय घेत या कामासाठी तांत्रिक सल्लागारांची नियुक्ती केली. तांत्रिक सल्लागाराने शहरातील अन्य पुलांप्रमाणेच मरिन लाइन्स रेल्वे स्थानकांबाहेरील (पूर्वेच्या) दोन पुलांची तपासणी केली आणि पादचाऱ्यांसाठी हे पूल धोकादायक असल्याचे जाहीर केले. त्यामुळे पालिकेने ऑक्टोबर २०१८ मध्ये हे दोन्ही पूल पादचाऱ्यांसाठी बंद केले.

नरिमन पॉइंट, कुलाबा, चर्चगेट परिसरात कामानिमित्त आपल्या वाहनाने जाणारे अनेक नागरिक महर्षी कर्वे मार्गाचा वापर करतात. तसेच या मार्गावर चर्चगेट, मरिन लाइन्स आणि चर्नी रोड रेल्वे स्थानके असून या रेल्वे स्थानकांमध्ये महर्षी कर्वे मार्गावरून मोठय़ा संख्येने प्रवाशांची ये-जा सुरू असते. त्यामुळे या मार्गावर कायम वर्दळ असते. मरिन लाइन्स रेल्वे स्थानकात जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी बांधलेले हे दोन पूल कालौघात धोकादायक बनले आणि ते पाडून टाकण्याची शिफारस तांत्रिक सल्लागाराने पाच-सहा महिन्यांपूर्वी केली. पादचाऱ्यांसाठी बंद केलेले हे पूल आजही ‘जैसे थे’ आहेत. या पुलांना तडे गेले आहेत.

रेल्वे आणि रस्ते वाहतुकीमुळे या पुलांना हादरे बसत आहेत. अत्यंत धोकादायक अवस्थेत असलेल्या या पुलांखालून वाहनांची वाहतूक सुरू आहे. तसेच रेल्वे स्थानकात उतरणारे प्रवासीही याच पुलांखालून रस्ता ओलाडून इच्छितस्थळी रवाना होता आहेत. या पुलांमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाला जोडणारा हिमालय पूल कोसळल्यामुळे पालिका अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून धोकादायक झाल्याने पादचाऱ्यांसाठी बंद केलेले पूल पाडून टाकण्याची धावपळ सुरू केली आहे.

मात्र हे दोन्ही पूल पाडण्यासाठी महर्षी कर्वे मार्गावरील वाहतूक अन्य मार्गे वळवावी लागणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून परवानगी आवश्यक आहे.

ही बाब लक्षात घेऊन पालिकेच्या ‘सी’ विभाग कार्यालयाने वाहतूक पोलिसांना पत्र पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक पोलिसांकडून परवानगी मिळताच हे दोन्ही पूल एका रात्रीत पाडून दुसऱ्या दिवशी सकाळी हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

मरिन लाइन्स स्थानकाबाहेरील (पूर्वेकडील) धोकादायक पूल पाडण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी येथील वाहतूक अन्य मार्गे वळविण्यात यावी याकरिता वाहतूक पोलिसांना पत्र पाठविण्यात येणार आहे.

– विनायक विसपुते, साहाय्यक आयुक्त, ‘सी’ विभाग