31 March 2020

News Flash

पूरग्रस्त भागांत आता कचऱ्याचे आव्हान

८ दिवसांत वर्षभराचा कचरा जमा; वर्गीकरण न केल्याने समस्येत वाढ

|| सुहास जोशी

८ दिवसांत वर्षभराचा कचरा जमा; वर्गीकरण न केल्याने समस्येत वाढ

सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्य़ांतील महापूर ओसरल्यानंतर सर्वाधिक काळात पाण्याखाली असलेल्या गावांसमोर कचरा व्यवस्थापनाचे आव्हान उभे ठाकले आहे. जवळपास दहा दिवस पुराचे पाणी साचलेल्या गावांतील कचऱ्याचे ढीग कचराभूमीवर साठत आहेत. त्यात सर्वच प्रकारचा कचरा एकत्र असल्याने सामाईक प्रक्रिया वापरून विल्हेवाट लावणे आणखी कठीण होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

कृष्णा-पंचगंगा संगमाजवळील सुमारे ३० हजार लोकसंख्येच्या कुरुंदवाडमध्ये नेहमीच्या परिस्थितीत वर्षांला सुमारे १८०० टन कचरा जमा होतो; मात्र दहा दिवसांच्या महापुरानंतर आठ दिवसांतच अंदाजे १२०० टन कचरा जमा झाल्याचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सांगितले. सध्याच्या कचराभूमीच्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. सर्वाधिक काळ पाण्याखाली असलेली सुमारे २१ गावे शिरोळ तालुक्यात असून, बहुतांश ठिकाणी ग्रामपंचायत आहे. या सर्वच ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमत आहेत.

महापुरानंतरच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जैवविरजणाचा (बायो कल्चर) वापर करण्यावरच सध्या यंत्रणांचा भर आहे. मात्र हा कचरा संमिश्र असल्यामुळे त्यावर केवळ याच प्रक्रियेचा वापर करून या समस्येवर उपाय निघणार नाही, असे आयआयटी, मुंबई येथील पर्यावरणशास्त्र अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक आणि घनकचरा व्यवस्थापन तज्ज्ञ श्याम असोलेकर यांनी सांगितले. हा कचरा उचलतानाच त्याचे वर्गीकरण करणे आवश्यक होते, तसे ते झालेले नसल्यामुळे कचराभूमीवर त्याचे वर्गीकरण करावे लागेल आणि मगच त्याची विल्हेवाट लावावी लागेल. अन्यथा या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम पूर्ण होणार नाही, असे प्रा. असोलेकर म्हणाले.

‘पूरग्रस्त भागांतील सर्व ग्रामपंचायतींच्या कचऱ्याची आकडेवारी जमा केली जात आहे. वर्गीकरण करण्याचे आव्हान आहे. सध्या त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत,’ असे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.

शास्त्रीयदृष्टय़ा विल्हेवाट लावण्यासाठी वर्गीकरण करण्याची गरज असली तरी अनेक गावांमध्ये घराघरांमधून रस्त्यावर ठेवलेला कचरा उचलण्यासाठीच किमान आठ दिवस लागले होते. ते पाहता या कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी भविष्यात आणखी मनुष्यबळ आणि पैसे खर्च करावा लागणार, असे ते म्हणाले.

शास्त्रीय अभ्यासानुसार ३० हजार लोकवस्तीच्या गावात नेहमीच्या परिस्थितीत चार टन जैविक कचरा, एक टन पुनर्चक्रित करता येईल असा कचरा आणि ०.२५ टन इतर कचरा जमा होतो. म्हणजेच वर्षांला १९०० ते २००० टन कचरा तयार होतो. त्यानुसार ३० हजार लोकवस्तीच्या गावात महापुरानंतर आठ दिवसांतच सुमारे १५०० टन कचरा जमा होण्याची शक्यता प्रा. श्याम असोलेकर व्यक्त करतात. त्यापैकी ८०० टन जैविक विघटन होणारा कचरा, ६०० टन कचरा हा पुनर्चक्रित करता येण्यासारखा कचरा आणि १०० टन इतर कचरा असू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2019 12:54 am

Web Title: pollution due to krishna river flood mpg 94
Next Stories
1 सर्जिकल स्ट्राईक, कलम ३७० हे निर्णय ‘फास्टफुड’सारखे; राऊतांचे मोदी सरकारला चिमटे
2 पूरग्रस्तांसाठी पुण्यातील मूर्तीकारांचा पुढाकार, बाप्पाच्या पाच हजार मूर्ती पाठविणार
3 …तोपर्यंत फेटा बांधणार नाही, खासदार अमोल कोल्हेंचा निर्धार
Just Now!
X