इंद्रायणी नार्वेकर-करंबे

प्रमुख, उपप्रमुखांची नियुक्ती; मात्र रचनेबाबत अस्पष्टता

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकालगतचा हिमालय पुलाचा भाग कोसळल्यानंतर पुलाच्या देखरेखीसाठी महिनाभरात स्वतंत्र प्राधिकरण तयार करण्याची घोषणा पालिका प्रशासनाने केली होती. मात्र या दुर्घटनेला महिना होत आला तरी प्राधिकरण स्थापनेला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. प्राधिकरणाच्या प्रमुखपदी पूल विभागाचे उपप्रमुख अभियंता एस. जी ठोसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र अद्याप या प्राधिकरणाची रचनाच निश्चित झालेली नाही.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पूल १४ मार्च रोजी कोसळला आणि या दुर्घटनेत सहा जण ठार झाले, तर ३० जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशांनुसार पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या प्रकरणाची चौकशी करून २४ तासांमध्ये प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश दक्षता विभागाच्या प्रमुख अभियंत्यांना दिले होते.  या अहवालात शहरातील पुलांच्या तपासणीसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली. त्यानुसार महिनाभरात स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करण्याबाबतचा आराखडा करण्याचे आदेश अजोय मेहता यांनी पालिकेच्या संचालकांना (अभियांत्रिकी सेवा आणि प्रकल्प) दिले होते. मात्र पूल विभागात आधीच मोठय़ा प्रमाणावर रिक्त पदे असून त्यात काही अभियंते निवडणुकीच्या कामावर पाठवण्यात आले आहेत. तर हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी काहींना न्यायालय, पोलीस ठाणे येथे जावे लागत असल्यामुळे या प्राधिकरणाचा आराखडा रखडला असल्याची माहिती उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.

३७४ पुलांची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी

मुंबईमधील एकूण ३७४ पुलांची देखभाल पालिकेतर्फे केली जाते. त्यात उड्डाणपूल, पादचारी पूल, भुयारी मार्ग यांचा समावेश आहे. तसेच एमएमआरडीएने हस्तांतरित केलेल्या पुलांचाही समावेश आहे. यापैकी कोणत्या पुलाची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे, किती वेळेमध्ये पुलांची पाहणी करण्याची गरज आहे, पाहणीचा प्रमाणित अहवाल तयार करावा, पूल विभागातील अभियंत्यांची जबाबदारी काय आहे, धोकादायक पुलासाठी तात्काळ कोणत्या उपाययोजना कराव्या आदी कामाची जबाबदारी या प्राधिकरणावर सोपविण्यात येणार आहे.