28 February 2021

News Flash

रस्ते अद्यापही खड्डय़ातच!

परिणामी, लोकप्रतिनिधी धास्तावले असून त्यांनी विभाग कार्यालयांमध्ये खेटे घालायला सुरुवात केली आहे.

गणेशोत्सव मंडळांचा लोकप्रतिनिधीविरुद्ध एल्गार; खड्डे बुजविण्याबाबत पालिकेची उदासिनता

गणेशोत्सव अवघ्या आठवडय़ावर आला असताना पालिकेकडून मात्र खड्डे बुजविण्यासाठी तारखांवर तारखा दिल्या जात आहेत. पण रस्ते अद्यापही खड्डय़ातच आहेत. पालिकेच्या या उदासिनतेला कंटाळलेल्या भांडूपच्या विकास मंडळाने पालिकेच्या विभाग कार्यालयातील रस्ते विभागामधील अधिकाऱ्यांची गचांडी धरून त्यांना उखडलेल्या पदपथांची वारी घडविली. मात्र खड्डे बुजविण्यासाठी आवश्यक साहित्य नसल्याची रडकथा गात अधिकाऱ्यांनी आपली सुटका करुन घेतली. त्यामुळे आता खड्डे बुजविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा अन्यथा नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणारे लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांविरुद्ध एल्गार पुकारण्याचा पवित्रा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. परिणामी, लोकप्रतिनिधी धास्तावले असून त्यांनी विभाग कार्यालयांमध्ये खेटे घालायला सुरुवात केली आहे.

पावसाच्या तडाख्यामध्ये रस्त्यांची चाळण झाली असून गणेशोत्सवापूर्वी गणेश आगमन आणि विसर्जन मार्ग खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांना दिले होते. मुंबईतील रस्ते २१ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र २१ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजविण्यात अधिकारी अपयशी ठरले. त्यानंतर पुन्हा एकदा २६ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजवून रस्ते गुळगुळीत करण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाकडून देण्यात आले. ही मुदतही शुक्रवारी संपुष्टात आली. मात्र तरी मुंबईतील अनेक रस्ते खड्डय़ांमध्येच आहेत. पाऊस अधूनमधून कोसळत असल्यामुळे खड्डे बुजविता येत नाही, अशी सबब पालिका अधिकाऱ्यांकडून वारंवार देण्यात येत आहे.

गेल्या रविवारी अनेक मोठय़ा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाची मोठी मूर्ती मंडपस्थळी वाजगाजत आणली. रस्त्यांवर पडलेले असंख्य खड्डे चुकवत मंडळांना ‘श्रीं’ची मूर्ती घेऊन यावी लागली. गणरायाची ट्रॉली खड्डय़ात अडकू नये यासाठी मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खड्डय़ांमध्ये गोणपाट कोंबले आणि त्यावर स्टीलची प्लेट ठेवली. या प्लेटवरुन ट्रॉली पुढे सरकवत मंडळांनी खड्डय़ांवर मात करीत गणरायाची मूर्ती मंडपस्थळी आणली.

गणेशोत्सव जवळ आला असताना रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात न आल्याने संतप्त झालेल्या भांडूपमधील विकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट पालिकेचे विभाग कार्यालय गाठले. रस्ते विभागातील अधिकाऱ्यांकडे जाऊन त्यांनी खड्डे बुजविण्याविषयी विनंती केली. इतक्यावरच पदाधिकारी थांबले नाहीत, तर खड्डे पडलेले रस्ते दाखविण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना विभागाची सफर घडविली. पदपरथावर पडलेले खड्डे त्यांनी अधिकाऱ्यांना दाखविले. पदपथावर बसविलेले पेवरब्लॉस विभाग कार्यालयाकडे नाहीत.

त्यामुळे अधिकाऱ्यांनी पदपथावरील खड्डे बुजविण्याबाबत असमर्थता व्यक्त केली. अखेर पदपथावरील खड्डे डांबराने बुजवून तात्पुरती मलमपट्टी करण्याची तयारी पालिका अधिकाऱ्यांनी दाखविली. हेही नसे थोडके म्हणत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी निश्वास टाकला.

गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्ड्ेमुक्त झाले नाहीत, तर पालिकेच्या आगामी निवडणुकीत लोकप्रतिनिधींना दणका देण्याचा निर्णय गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. याची कुणकुण लागल्यामुळे अनेक लोकप्रतिनिधी धास्तावले असून त्यांनी पालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये खेटे घालून रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी अधिकाऱ्यांमागे तगादा लावला आहे.

खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने दोन तारखा दिल्या. पण आजही रस्ते खड्डय़ातच आहेत. गिरगाव, लालबाग, परळ भागातील मूर्तीकारांच्या गणेश कार्यशाळा असून येथून विविध ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांवर असंख्य खड्डे पडले आहेत. खड्डे बुजविण्यासाठी आता पालिकेवर अवलंबून राहण्यात अर्थ नाही. गणेशोत्सव मंडळांनीच खड्डय़ांमध्ये गोणपाट भरावे आणि त्यावर स्टीलची प्लेट टाकून त्यावरुन  गणेशमूर्तीची ट्रॉली पुढे सरकवावी. प्रशासन काम करीत नसेल तर नगरसेवकांनी त्यांच्याकडून ते करुन घ्यायला हवे. परंतु प्रशासन आणि लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

-अ‍ॅड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2016 2:04 am

Web Title: potholes issue in mumbai 5
Next Stories
1 जुहूतील योजनेत झोपु प्राधिकरणाचीच दांडगाई!
2 ‘मुंबईचा राजा’ कोण होणार?
3 सारासार : मछली जंगल की रानी थी..
Just Now!
X