प्रतिदिन दोन मेट्रिक टन ओल्या कचऱ्यापासून ३०० युनिट विजेची निर्मिती

मुंबई : कचराभूमीत जाणाऱ्या कचऱ्याचा भार हलका करण्यासाठी दक्षिण मुंबईतील हाजी अली परिसरात ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात आला असून या प्रकल्पाचे लोकार्पण शुक्रवार, ३ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. करोना संसर्गामुळे या प्रकल्पाला काहीसा विलंब झाला आहे. मात्र आता प्रतिदिन दोन टन ओल्या कचऱ्यापासून ३०० युनिट विजेची निर्मिती करण्यात येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईकरांचा कचरा देवनार, कांजूर आणि मुलुंड कचराभूमीत टाकण्यात येत होता. मात्र या तीनही कचराभूमींतील कचरा सामावून घेण्याची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे मुलुंड कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यात येत आहे. त्यामुळे आजघडीला मुंबईतील कचरा कांजूर आणि देवनार कचराभूमीत टाकण्यात येत आहे. कचराभूमींवरील कचऱ्याचा भार कमी व्हावा म्हणून मोठय़ा सोसायटय़ांना त्यांच्या ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प उभारण्याची सक्ती करण्यात आली होती. मात्र त्यालाही काही सोसायटय़ांकडून विरोध करण्यात आला.

मुंबईत प्रतिदिन सहा हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. कचराभूमींची क्षमता संपुष्टात आल्यामुळे कचरा निर्माण होतो तेथेच त्याची विल्हेवाट लावण्याकडे पालिकेचा कल आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाने हाजीअली चौकाजवळील केशवराव खाडय़े मार्गावरील एका दीड हजार चौरस फुटांच्या भूखंडावर हा प्रकल्प उभारला आहे. करोनामुळे या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या बाबी वेळेवर उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे या प्रकल्पाला काहीसा विलंब झाला आहे. अखेर या प्रकल्प उभारण्याचे काम पूर्ण झाले असून शुक्रवार, ३ सप्टेंबर रोजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

‘डी’ विभाग कार्यालयाच्या हद्दीमध्ये दररोज साधारण २०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. यापैकी दररोज दोन मेट्रिक टन ओल्या कचऱ्यापासून हाजीअली येथे ३०० युनिट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. दररोज दोन मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती करण्यासाठी दोन हजार लिटर पाणी लागणार आहे. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून जैवइंधन तयार करण्यात येणार असून त्याद्वारे वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. जवळच असलेल्या केशवराव खाडय़े उद्यानाला या प्रकल्पातून वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर येथील पथदिवेही या विजेने उजळणार आहेत.

पथदिवे आणि उद्यानासाठी १८० युनिट वीजेचा पुरवठा करण्यात येणार असून उर्वरित विजेचा वापर या प्रकल्पासाठी करावा लागणार आहे. या प्रकल्पामुळे विजेपोटी येणाऱ्या खर्चाची बचत होणार आहे. त्याचबरोबर कचरा गोळा करून तो कचराभूमीपर्यंत वाहून नेण्याच्या खर्चातही बचत होणार आहे.

– प्रशांत गायकवाड, सहाय्यक आयुक्त, डी विभाग कार्यालय