उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली. अंबानी यांना धमकी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येशी शर्मा यांचा संबंध असावा, असा संशय एनआयएला आहे.

शर्मा यांना बहुचर्चित रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैया हत्येप्रकरणी (बनावट चकमक) अटक झाली होती. सुमारे तीन वर्षे ते कारागृहात होते. मनसुख हत्येप्रकरणी एनआयएने अटक केलेला निलंबित पोलीस शिपाई विनायक शिंदे लखनभैया हत्या प्रकरणात सहआरोपी होता. या गुन्ह््यातून शर्मा वगळता उर्वरित सर्व आरोपींना(शिंदेसह) न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा ठोठावली.

निर्दोष मुक्त झाल्यानंतर शर्मा यांनाही पुन्हा सेवेत घेण्यात आले. सध्या चर्चेत असलेले महासंचालक परमबीर सिंह ठाणे शहरात पोलीस आयुक्त असताना शर्मा यांच्याकडे तेथील खंडणीविरोधी पथकाच्या प्रमुखपदाची जबाबदारी होती.

शर्मा यांच्याकडे बुधवारी सुमारे आठ तास चौकशी केल्यानंतर गुरुवारी त्यांना एनआयएने पुन्हा चौकशीस बोलावले. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि जुने सहकारी सचिन वाझे यांना समोर आणून शर्मा यांच्याकडे एनआयएने चौकशी केल्याचे समजते.

चौघांचे जबाब नोंद

तत्कालिन गृहमंत्री यांच्यावर पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांनी के लेल्या आरोपांबाबत केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) चौकशी सुरू के ली. शहरात दाखल झालेल्या सीबीआयच्या विशेष पथकाने दोन दिवसांत सिंह यांच्यासह निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त संजय पाटील, याचिकाकत्र्या अ‍ॅड. जयश्री पाटील यांचे जबाब नोंदवले.  देशमुख यांनी वाझ यांच्याकडे दरमहा १०० कोटी गोळा करण्याचे उद्दिष्ट बोलून दाखवल्याचा आरोप आहे.

वाझे यांची वैद्यकीय तपासणी

वाझे यांना गुरुवारी दुपारी एनआयए अधिकाऱ्यांनी जेजे रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी जेजे रुग्णालयात नेले होते. चाचणी करून त्यांना पुन्हा एनआयएच्या ताब्यात देण्यात आले. त्यांचे चाचणी अहवाल एनआयए अधिकाऱ्यांना दिल्याचे जेजे रुग्णालयातून सांगण्यात आले.