17 January 2021

News Flash

…मग तुम्ही कशाला राज्य सरकार चालवता? उठसूठ केंद्राकडे बोट दाखवणं बंद करा – दरेकर

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून शिवसेनेवर साधला निशाणा

संग्रहीत

औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारितील विषय आहे. त्यामुळे राज्य सरकारने उठसूट कोणतीही गोष्ट केंद्र सरकारवर ढकलणे बंद केलं पाहिजे. अशा शब्दांमध्ये विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

तसेच, कुठल्याही शहराचं नामकरण करण्यासाठी महापालिकेचा प्रस्ताव, राज्य सरकारची मंजुरी आणि मग केंद्राची मान्यता अशी प्रक्रिया आहे. औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करायच असेल, तर महापालिका तुमची आहे तिथे ठराव करा, राज्याच्या कॅबिनेटला निर्णय द्या. असं देखील दरेकर यांनी सांगितलं आहे.

याच पार्श्वभूमीवर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना प्रवीण दरेकर यांनी म्हटले की, “यांचा(राज्य सरकारचा) एकही विषय, एकही दिवस, एकही सेकंद केंद्राशिवाय जात नाही. कुठलीही गोष्ट आली की केंद्राकडे बोट दाखवयचं, मग तुम्ही कशाला राज्य सरकार चालवता? महाकाली लेणी संदर्भात निर्णय घेताना तुम्ही केंद्राला विचारलं होतं का? आमच्या अस्मितेसंदर्भात कुठलाही विषय केंद्राकडे अडकणार नाही. आम्ही त्याच्या पाठीशी असू. परंतू, नाचता येईना अंगण वाकडं अशी त्यांची गत झालेली आहे.”

आता त्यांना सत्ता जास्त महत्वाची आहे –
काँग्रेसने नामांतराच्या मुद्यावर घेतलेल्या भूमिकेबद्दल बोलताना दरेकर शिवसेनेला उद्देशून म्हणाले, “बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेवर आता प्रतिक्रिया द्यावी. काही झालं तरी चालेल, प्रसंगी सत्ता सोडू पण संभाजीनगर नामकरकण करू असं म्हणत होते, आता आहे का हिंमत? आता त्यांना सत्ता जास्त महत्वाची आहे. त्यामुळे केंद्राकडे बोट दाखवून जनतेचं फारकाळ लक्ष विचलीत करता येणार नाही.”

औरंगाबादच्या नामांतरला काँग्रेसचा विरोध, महाविकास आघाडीत ठिणगी?

महाराष्ट्रातील जनता दुधखुळी नाही –
“तुम्ही अगोदर कॅबिनेटचा निर्णय घ्या आणि महाराष्ट्र सरकार म्हणून शिफारस करा. आम्ही केंद्राला सांगू की याला मदत करा. परंतु करायचं नाही आणि केंद्राकडे बोट दाखवायचं, अशाप्रकारची त्यांची एक ठरलेली रणनीती आहे. परंतु हे न समजण्या इतकी महाराष्ट्रातील जनता दुधखुळी नाही.” असं देखील दरेकरांना यावेळी बोलून दाखवलं.

“सरकार तीन पक्षांचं आहे हे विसरून चालणार नाही”

औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा सध्या अधिकच गरम होत असल्याचं दिसत आहे. औरंगाबादचे संभाजीनगर केले जावे, अशी मागणी भाजपा व मनसेने लावून धरली आहे. तर, औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करणार असल्याची घोषणा शिवसेनेने वारंवार केली आहे. एवढंच नाही तर बाळासाहेब ठाकरेंचं हे स्वप्न होतं त्यामुळे ते पूर्ण करणारचं असं शिवसेनेने म्हटलं आहे. मात्र यावरून आता काँग्रेस व शिवसेना यांच्यात धुसफुस सुरू झाल्याचे दिसत आहे. काँग्रेस नेते या मुद्यावरून शिवसेनेवर निशाणा साधत आहेत.

औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये ‘नुरा कुस्ती’- फडणवीस

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात नुरा कुस्ती सुरु आहे असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. “काँग्रेसने औरंगाबादच्या संभाजीनगर या नामकरणाला विरोध केला काय किंवा नाही केला काय? शिवसेनेला हा मुद्दा फक्त निवडणुकीपुरता हवा असतो. या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात नुरा कुस्ती सुरु आहे.” असं फडणवीस म्हणाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2021 9:48 am

Web Title: pravin darekar criticized shiv sena on aurangabad renaming issue msr 87
Next Stories
1 मुंबईत लस येताच २४ तासांत मोहिमेला प्रारंभ
2 प्रियकर आणि मैत्रिणीकडून हत्या!
3 बाहेरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये यंदा मोठी घट
Just Now!
X