शाई पेनाने फे रफार करून तातडीच्या कामकाजात समावेश

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई :  विकासकांना विकास अधिमूल्यामध्ये ५० टक्के सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव भाजपचा विरोध डावलून स्थायी समितीत मंजूर झाल्यानंतर गुरुवारी झालेल्या पालिका सभागृहाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या प्रस्तावावरून आता शिवसेना-भाजपमध्ये राजकारण रंगले आहे. हा प्रस्ताव चुकीच्या पद्धतीने सभागृहाच्या पटलावर आणल्याचा आरोप भाजपने केला आहे. शाई पेनाने फेरफार करून हा प्रस्ताव तातडीचे कामकाज म्हणून सादर करण्यात आल्याचा आरोप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

मुंबई शहरातील विकासकांना विकास अधिमूल्यामध्ये ५० टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर केला होता. भाजपने या प्रस्तावाला विरोध केला होता. पालिकेचे उत्पन्न घटले असताना विकासकांना सूट देण्याची आवश्यकता काय, असा सवाल करीत हा प्रस्ताव दप्तरी दाखल करावा अशी उपसूचना प्रभाकर शिंदे यांनी केली होती. या उपसूचनेवर मतदान घेऊन संख्याबळाच्या जोरावर हा प्रस्ताव अध्यक्षांनी मंजूर केला. या प्रस्तावाच्या सहपत्रात शेवटच्या ओळीत निळ्या शाईच्या बॉलपेनने ‘सदर कामकाज तातडीचे कामकाज समजण्यात यावे’ असे लिहिले होते. यावर भाजपने शुक्रवारच्या स्थायी समितीत हरकतीच्या मुद्याद्वारे आक्षेप घेतला.  स्थायी समितीत मंजूर  प्रस्तावावर बॉलपेनने ‘तातडीचे कामकाज’ असे लिहिता येते का याबाबत पालिका चिटणीस खात्याने लेखी खुलासा करावा, अशी मागणी शिंदे यांनी केली.  प्रस्तावात फेरफार करून तातडीचे कामकाज करत  प्रस्ताव सदस्यांच्या घरी पाठवल्याबद्दल भाजपने आक्षेप घेतला. सभागृह दृक्श्राव्य माध्यमातून घेतल्यामुळे सदस्यांना म्हणणे नीट मांडता येत नाही. गोंधळाच्या बैठकीत भाजपच्या सर्व नगरसेवकांना ‘म्युट’ करून घाईघाईत प्रस्ताव मंजूर केला, असा आरोपही शिंदे यांनी केला.