मुंबई : करोनाकाळात योग्य वैद्यकीय सेवा मिळण्यात अडसर येऊ नये यासाठी गेली दीड वर्षे मुंबई विद्यापीठातील अस्थायी कर्मचाऱ्यांकडून आरोग्य विम्याची मागणी होत आहे. मात्र, गेल्या आठवडय़ात एका तरुण कर्मचाऱ्याचा करोनाने मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा विम्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यापीठाने तातडीने आरोग्य विम्याची तरतूद करावी तसेच मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला मदतीचा हात द्यावा, अशी मागणी कामगार संघटनेने केली आहे.

सध्या शिक्षण ऑनलाइन झाले असले तरी विद्यापीठाशी निगडित अनेक बाबींची पूर्तता करण्यासाठी कर्मचाऱ्यांना विद्यापीठात यावे लागत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने विद्यापीठाने कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विम्याची तरतूद केली, परंतु त्यातून अस्थायी कर्मचाऱ्यांना वगळले. जवळपास १२०० अस्थायी कर्मचारी कारोनाकाळात विम्यापासून वंचित राहिल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरक्षा रक्षक असलेल्या ३६ वर्षीय अमोल पवार यांचा ३ जून रोजी करोनाने मृत्यू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये अधिकच असंतोषाचे वातावरण आहे.

गेली १८ वर्षे अमोल पवार विद्यापीठाच्या फोर्ट येथील संकुलात कार्यरत होते. करोनाकाळातही ते  १ मेपर्यंत नियमित कामावर येत होते.  ११ मे रोजी त्यांची तब्येत अचानक खालावल्याने त्यांना कल्याणमधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान प्रकृती गंभीर होऊन ३ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावरच होती. त्यांची पत्नी सध्या गर्भवती असल्याने कुटुंबाच्या भविष्याचा प्रश्न अधिक गंभीर असल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.

‘रेल्वे प्रवास बंद असल्याने अनेक अडचणींचा सामना करत विद्यापीठात पोहोचावे लागते. सेवेत कुठेही कमी पडत नसताना आम्हाला पुरेसे वेतन मिळत नाही. आरोग्य विमा मिळत नाही. आज एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असला तरी अनेक कर्मचारी बाधित असल्याने त्यांचेही आरोग्य असेच वाऱ्यावर आहे,’ अशी खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

अमोल याच्या कुटुंबाला अर्थसाहाय्य करावे आणि त्याच्या पत्नीला विद्यापीठात नोकरी द्यावी,’ अशी मागणी माजी अधिसभा सदस्य संजय वैराळ यांनी केली आहे.

जबाबदार कोण? 

विद्यापीठ प्रशासन अत्यंत बेजबाबदारीने कर्मचाऱ्यांचे प्रश्न हाताळत आहे. आजवर अनेकदा आरोग्य विम्याची मागणी करूनही त्याचा विचार केला जात नाही. न्यायालय, शिक्षणमंत्री यांनी सूचना देऊनही अन्य न्यायप्रविष्ट गोष्टींवर बोट ठेवून विद्यापीठ अस्थाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत. आरोग्य सेवेआभावी कर्मचाऱ्यांचा जीव जात असेल तर याला जबाबदार कोण.

– मिलिंद तुळसकर, अध्यक्ष, मुंबई विद्यापीठ कामगार संघटना   

केवळ विद्यापीठातील कर्मचारीच नव्हे तर अस्थायी कर्मचारी, शिक्षकवर्ग, विद्यार्थी सगळ्यांसाठीच विद्यापीठ एक योजना आखत आहे. ज्यामध्ये करोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या परिवारास मदतीचा हात दिला जाईल. लवकरच याबबत अधिकृती घोषणा होईल.

– डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू