मुंबई : ट्रेलरची धडक बसल्याने किंग्ज सर्कल स्थानकाजवळील रेल्वे पुलाचा भाग शुक्रवारी पहाटेच्या सुमारास निखळला. अपघात होऊ नये म्हणून पालिकेने निखळलेला पुलाचा भाग पडून टाकला. या कामामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून शीवकडे जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
किंग्ज सर्कलजवळ हार्बर रेल्वेची वाहतूक करणाऱ्या पुलाशेजारी पादचारी पूल आहे. पहाटे सहाच्या सुमारास दादरहून शीवकडे जाणारा ट्रेलर कंटेनरच्या अधिक उंचीमुळे रेल्वे पुलावर आदळला. त्यामुळे पुलाखालील उंचीची मर्यादा दर्शविणारा लोखंडी सापळा निखळला. ही बाब सकाळी वाहतूक पोलीस आणि माटुंगा पोलिसांच्या लक्षात आली. निखळलेला लोखंडी सापळा खाली पडल्यास अपघात होण्याची लक्षात लक्षात घेऊन पोलिसांनी पालिकेशी संपर्क साधला. पालिकेने लोखंडी सापळा पूर्णपणे उचकटून बाजूला केला. हे काम संध्याकाळी पाचच्या सुमारास पूर्ण झाले. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील (माटुंगा पोलीस ठाण्यासमोरील) दादरहून शीवकडे जाणाऱ्या रस्त्याचा काही भाग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे संध्याकाळी घाईच्या वेळी या परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गानी वळवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळी सहानंतर वाहतूक सुरळीत झाली. या प्रकरणी ट्रेलर चालक कुलदीप सिंग याच्याविरोधात माटुंगा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 29, 2020 3:47 am