वाढत्या गर्दीमुळे रेल्वे स्थानकांतील आणखी प्रवेशद्वारे खुली करण्याच्या सूचना

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर वाढत जाणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीमुळे स्थानकातील आणखी काही प्रवेशद्वारे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात फक्त गर्दीच्या स्थानकांतील प्रवेशद्वारे खुली करण्याचा सूचना मध्य आणि पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळेल.

सध्या अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठीच लोकल धावत आहे. टाळेबंदीत रस्तेमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता विविध श्रेणींना प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवासी संख्येत वाढ होत आहे. मध्य रेल्वेवरून दरदिवशी सात लाख प्रवासी प्रवास करू लागले आहेत, तर पश्चिम रेल्वेवरील लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या ६ लाख ९३ हजारांपर्यंत गेली आहे. जूनपासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांचा लोकल प्रवास सुरू झाल्यावर प्रत्येक मोठय़ा गर्दीच्या स्थानकातील पूर्व आणि पश्चिमेकडील प्रत्येकी एक प्रवेशद्वार बाहेर जाण्यासाठी आणि स्थानकात प्रवेश करण्यासाठी सुरू ठेवले होते. अशाने प्रवाशांची गैरसोय होत होती.

‘सीएसएमटी’सारख्या स्थानकात तर एक क्रमांकाच्या फलाटासमोरूनच बाहेर पडण्याची मुभा होती. तर पाच आणि सहा क्रमांकाच्या फलाटासमोर असलेल्या (जीपीओ दिशेकडील) प्रवेशद्वारातून आत येण्याची परवानगी होती. गर्दी वाढू लागताच शारीरिक अंतराचा फज्जा उडू लागला. शिवाय जीटी रुग्णालय किं वा पोलीस आयुक्त कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही स्थानकातून बाहेर पडण्यासाठी कसरत करावी लागते. यांसह अनेक समस्यांचा सामनाही विविध स्थानकांतील प्रवाशांना करावा लागत आहे. परंतु वाढणारी प्रवासी संख्या व गर्दीमुळे काही प्रवेशद्वारे पुन्हा खुली करण्याच्या सूचना दिल्याचे मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त के . के .अशरफ यांनी सांगितले.

सध्या मध्य रेल्वे उपनगरीय स्थानकातील (८० पेक्षा जास्त) सर्वच प्रवेशद्वारे खुली करू शकत नाहीत. मात्र वाढती प्रवासी संख्या पाहता गर्दीच्या स्थानकांतील काही प्रवेशद्वारे खुली केली जातील. गर्दीच्या वेळी ती खुली असतील. इतर वेळी बंद असतील, असेही संबंधित स्थानकांच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.

सीएसएमटीसह, कु र्ला, घाटकोपर व अन्य काही स्थानकांत ती खुली होतील. पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त विनीत खरप यांनी गर्दी पाहून काही स्थानकांतील आणखी एक ते दोन प्रवेशद्वारे खुली करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.

केवळ एक ते दोन

ज्या स्थानकांत सध्या दोन प्रवेशद्वारे खुली आहेत, तेथील गर्दी पाहून सर्वच प्रवेशद्वारे खुली न करता आणखी एक ते दोन प्रवेशद्वारे खुली करण्याचे आदेश आहेत.