मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. संध्याकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळत आहेत. दादर, परळ, हिंदमाता या ठिकाणी तसेच गिरगाव, लालबाग, परळ या ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. हिंदमाता भागातील सखल भागात पाणी साठण्यासही सुरुवात झाली आहे. एवढंच नाही तर रस्त्यावर वाहतूक कोंडीही होते आहे. घरी जाणाऱ्या मुंबईकरांना पावसाचा त्रास सहन करावा लागतो आहे.

पावसाचा परिणाम रेल्वे सेवेवरही झाला आहे. मध्य रेल्वेची सेवा १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. सोमवारी रात्रीही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने त्याचा फटका रेल्वे सेवेला बसला होता. आता पुन्हा एकदा ट्रेनने घरी जाणाऱ्या मुंबईकरांनाही पावसामुळे घरी पोहचण्यास उशीर होतो आहे. मुंबईच नाही तर ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ या ठिकाणीही पावसाच्या सरी कोसळत आहेत.

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पावसाला सुरुवात झाली आहे. आणखी चार ते पाच दिवस पावसाच्या सरी अशाच प्रकारे कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याआधी ऑगस्ट महिन्यात २ आणि ३ तारखेलाही मुसळधार पाऊस झाला होता. ज्यामुळे मुंबईकरांची लोकलसेवा विस्कळीत झाली होती. तर जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यातही चांगलाच पाऊस झाला होता. आता पुढचे काही दिवस पावसाचेच असणार आहेत.