मुसळधार पावसामुळे बुधवारी अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी धावत असलेल्या उपनगरी रेल्वेवर (लोकल) परिणाम झाला.

सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे चर्चगेट, मुंबई सेन्ट्रल, मरीन लाईन्स, चर्नी रोड स्थानकादरम्यान झाडे ओव्हरहेड वायर आणि रुळांवर पडली. त्यामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने सायंकाळी पाच वाजल्यापासून पश्चिम रेल्वेने मुंबई सेन्ट्रल ते चर्चगेट दरम्यान धावत असलेली लोकलसेवा बंद ठेवली. मुंबई सेन्ट्रल, दादर, वांद्रे, अंधेरीहून विरार, डहाणूसाठी लोकल चालवण्यात आल्या. परंतु या सेवांचाही वेग मंदावलेलाच होता.

सकाळपासून सुरळीत सुरू असलेल्या मध्य रेल्वेने मस्जिद बंदर, सॅन्डहर्स्ट रोड, परळ, सायन, कुर्ला, वडाळा या ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे सायंकाळी चारपासून सीएसएमटी ते ठाणे, सीएसएमटी ते वाशी दरम्यानची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. पावसाचा वाढलेला जोर पाहता सरकारी, पालिका कार्यालयातून काही कर्मचारी लवकरच निघाले. मात्र स्थानकात पोहोचताच लोकल बंद असल्याचे समजले. अनेकांनी लोकलची वाट पाहण्याचा निर्णय घेतला, तर काहींनी स्थानकाबाहेरुनच रिक्षा, टॅक्सी, बस अशा वाहनांनी घर गाठण्याचा प्रयत्न केला.

रुळावर साचलेल्या पाण्यामुळे सायंकाळी ६ च्या सुमारास सीएसएमटी ते कर्जत लोकल मस्जिद रोड ते भायखळा स्थानकादरम्यान थांबली. लोकलचे तीन डबे भायखळा स्थानकात तर नऊ डबे फलाटाबाहेर होते. त्यामुळे २०० पेक्षा अधिक प्रवासी अडकले. याच स्थानकादरम्यान टिटवाळाहून सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या लोकलमध्येही जवळपास ६० प्रवासी अडकले. रुळावर जवळपास अडीचे ते तीन फूट पाणी साचले होते. पाण्याची पातळी अधिक असल्याने प्रवाशांनी उतरुन जवळचे स्थानक गाठण्याचा धोका पत्करला नाही. त्यामुळे मोटरमन व गार्डने मदतीसाठी रेल्वेच्या नियंक्षण कक्षाला कळवले. रेल्वे पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

दरड हटविण्यात अडचण

कांदिवली परिसरातील बांडडोंगरी येथील पश्चिम द्रुतगती मार्गावर मंगळवारी पहाटे कोसळलेली दरड दोन दिवसानंतर अद्यापही पूर्ण हटवण्यात आली नाही. मंगळवारी सायंकाळपर्यंत दरड काही प्रमाणात हटवून दोन मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या. उर्वरीत दरड काढताना डोंगराचा आणखी भाग कोसळण्याची शक्यता असल्याने भूवैज्ञानिकांचा तांत्रिक सल्ला एमएमआरडीए आणि महापालिकेने घेतला. मंगळवारी रात्री उशिरा आणखी एक मोठा दगड कोसळल्याने सध्या पश्चिम द्रुतगती मार्गावरील या टप्प्यातील वाहतूक बंद करण्यात आली.

पालिका शाळांमध्ये व्यवस्था..

रुळांवरील पाणी ओसरले नसल्याने अनेक जण पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील स्थानकात अडकून पडले. तसेच रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली. कल्याण, डोंबिवली, बदलापूर, वसई, विरार व त्यापुढे जाणाऱ्यांना पर्यायी वाहतूकच नव्हती. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी अडकू न पडलेल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात थांबण्याची व्यवस्था रेल्वे स्थानकांनजीकच्या पालिका शाळांमध्ये मुंबई पालिकेकडून करण्यात आली.

झाले काय?

* वाडीबंदर, भायखळा, दादर, शीव, माटुंगा येथे पाणी साचल्याने पूर्व मुक्त मार्ग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले. परिणामी शहरापासून पूर्व उपनगरांचा संपर्क तुटतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

* वाहतूक पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शहरातून पूर्व उपनगरांत जाणाऱ्या प्रवाशांना आणि वाहतूक सुरू ठेवण्यासाठी पर्यायी मार्गाची उपायायोजना करणाऱ्या वाहतूक पोलिसांना सर्वाधिक मनस्ताप झाला. हिंदमाता, परळ, किंग्ज सर्कल, गांधी मार्केट या नेहमीच्या ठिकाणी तर पाणी साचलेच. शिवाय जेजे रुग्णालयाजवळ, भायखळा स्थानकासमोर (पूर्व), ताडदेव येथेही पाणी साचले.

* पश्चिम उपनगरांतून शहरात येणारा सागरी सेतू, वरळी, हाजीअली ते कुलाबापर्यंतचा मार्ग तुलनेने सुरक्षित होता. मात्र गिरगाव चौपाटीवर संध्याकाळी पाणी साचले. वाडीबंदर येथे पाणी साचल्याने पूर्व मुक्त मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी मार्गिका बंद करावी लागली. तसेच या मार्गाचा वापर करून पूर्व उपनगरांसह नवी मुंबईकडे जाणारी वाहतूक खोळंबली.

* भायखळा येथे संध्याकाळी चार फुटांपर्यंत पाणी साचले. जेजे रुग्णालय चौक, परळ, दादर टीटी, माटुंगा, शीव येथे पाणी साचल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरूनही वाहतूक वळवणे शक्य नव्हते. या कोंडीत भर पडू नये यासाठी पश्चिम भागातून पुर्वेकडे येणारी वाहने रोखण्यात आली.