मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोलबंदीबाबत केलेल्या घोषणेसंदर्भात त्यांचे अभिनंदन करतानाच सरकारच्या धोरणात पारदर्शकता नसल्याची टीका ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. टोलबंदी बाबत सरकारचा हेतू स्वच्छ असेल तर टोलनाके ‘कॅशलेस’ करून त्यात पारदर्शकता आणावी, असे ठाकरे यांनी ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी पत्रकार परिषदेत सांगितले.  
टोल संदर्भात यापूर्वी ‘मनसे’ने आंदोलन केले होते. आम्ही आंदोलन करत होतो तेव्हा हे पक्ष कुठेच दिसत नव्हते असा टोला त्यांनी ‘भाजप’ला हाणला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज टोलनाके बंद करण्याची घोषणा केली त्यात नेमके कोणते टोलनाके बंद होणार आहेत, आघाडी सरकराच्या काळातील टोलनाक्यांच्या बंदीचे काय झाले, ते खरोखरच बंद झाले होते की नव्हते, त्याचंी संख्या किती होती, आज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले टोलनाकेही तेच आहेत का? अशा सवालांच्या फैरीही राज  यांनी या वेळी झाडल्या.