पुण्यात ३ जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमाची उत्सुकता

राजकारण असो, समाजकारण असो की चित्रपट क्षेत्र असो.. या क्षेत्रांमधील दिग्गजांच्या प्रकट मुलाखती एक वेगळाच आनंद देणाऱ्या असतात. केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकट मुलाखत येत्या ३ जानेवारी रोजी पुणे येथे होणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पवारांना ‘बोलते’ करणार आहेत. ही मुलाखत ‘मॅचफिक्सिंग’ असणार नाही, तर कोणतीही पूर्वकल्पना न देता ‘ठाकरी भाषेत’ राज हे प्रश्नांची चौफेर गोलंदाजी करणार आहेत.

शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाली तसेच त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या पाश्र्वभूमीवर पुण्यातील बीएमसीसी कॉलेजच्या मैदानावर या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. विख्यात हास्यकवी रामदास फुटाणे यांनी या प्रकट मुलाखतीचे आयोजन केले असून ‘तेल लावलेले पेहेलवान’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शरद पवार यांना प्रश्नांच्या कैचीत राज कसे पकडणार याची एक वेगळीच उत्सुकता असेल. खरे तर शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि ५० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीच्या पाश्र्वभूमीवर अनेक मुलाखती झाल्या. तथापि या मुलाखतींमध्ये रंगतदार असे फारसे काही नव्हते. त्यामुळे चौकटीबाहेर जाऊन महाराष्ट्राला पुढील ५० वर्षे लक्षात राहील अशी मुलाखत कोण घेऊ शकेल याचा शोध शरद पवार यांच्या निकटवर्तीयांनी सुरू केला. अनेक नावांवर चर्चा झाली. दोन अडीच महिन्यांपासून हा शोध सुरू होता. ‘जागतिक मराठी अकादमी’चे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी राज ठाकरे यांचे नाव सुचवले. त्यानंतर शरद पवार यांची प्रकृती तसेच राज ठाकरे यांची संमती यावर चर्चा होऊन ३ जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. ही मुलाखत जुळवून आणण्यासाठी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही पुढाकार घेतला.

या प्रकट मुलाखतीमधील महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज हे आयत्या वेळी थेट प्रश्न विचारणार आहेत. प्रश्नांची कोणतीही कल्पना शरद पवार यांना आधी देण्यात येणार नसून राजकारण, समाजकारणासह पवारांशी संबंधित अनेक विषयांवर राज रोखठोक प्रश्न विचारतील अशी संकल्पना यामागे असल्याचे शरद पवार यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. पवारांचा राजकारण प्रवेश, वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडल्यानंतर खंजीर खुपसल्याची मिळालेली ‘पदवी’, काँग्रेसमधून बाहेर पडणे, सोनियांना केलेला विरोध, हुकलेले पंतप्रधानपद, कृषीमंत्री ते संरक्षणमंत्री प्रवास, मुख्यमंत्रीपदाच्या काळातील अवघड निर्णय, चित्रपट, साहित्यिकांशी जवळीक, समाजकारण, बारामती कशी घडवली येथपासून ते नरेंद्र मोदींशी असलेली जवळीक व मोदींचे राजकारण तसेच पवारांनी आजारपणाचा सामना कसा केला येथपासून काका-पुतणे संबंध, सुप्रियाची वाटचाल तसेच राष्ट्रवादीचे भवितव्य अशा प्रश्नांची चौफेर गोलंदाजी करण्याची संधी राज यांना मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांत महाराष्ट्राने अशी प्रकट मुलाखत पाहिली नसेल अशी ही मुलाखत असेल असे सूत्रांचे म्हणणे आहे.