अंमली पदार्थविरोधी पथकाकडून (एनसीबी) अभिनेत्री रकुल प्रीत सिंहची शुक्रवारी चौकशी झाली. रिया चक्रवर्ती आणि तिच्यात झालेल्या व्हॉट्स अॅप चॅटविषयी एनसीबीने प्रश्न विचारले. त्या चॅटमध्ये डूब (doob) असा शब्द वापरण्यात आला होता. हा शब्द कशासाठी वापरला होता, त्याचा खुलासा रकुलने या चौकशीदरम्यान केला.

‘डूब’ म्हणजे रोल केलेला तंबाखू असं रकुलने सांगितलं. ‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, रकुलने एनसीबीला सांगितलं की रियासोबत झालेल्या तिच्या व्हॉट्स अॅप चॅटमधील ‘डूब’ हा शब्द रोल केलेल्या तंबाखूसाठी वापरला गेला होता. याविषयी एनसीबीचे अधिकारी म्हणाले, “रियाच्या चौकशीदरम्यान आम्ही तिचे व्हॉट्स अॅप चॅट तपासले. या चॅटमध्ये रियाने रकुलला विचारलं होती की तिच्याकडे ‘डूब’ आहे का? त्यावर रकुलने ते माझ्या घरी आहे असं तिला सांगितलं होतं.” चौकशीदरम्यान रियाने तो शब्द ड्रग्ससाठी वापरल्याची माहितीही या अधिकाऱ्यांनी दिली.

अभिनेत्रींचे मोबाइल फोन्स जप्त

अंमलीपदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह या चार अभिनेत्रींचे मोबाइल फोन्स जप्त केले आहेत. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भातली माहिती दिली. या चार अभिनेत्रींसोबतच दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश, सिमोन खंबाटा आणि जया साहा यांचेसुद्धा फोन्स जप्त करण्यात आले आहेत. एनसीबीच्या मुंबई विभागाकडून अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी अंमलीपदार्थांचा संबंध आहे का, याबाबत तपास सुरू आहे.