ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या चौकशीच्यावेळी तिच्यासोबत उपस्थित राहण्यासाठी रणवीर सिंगने कोणतीही लिखित किंवा शाब्दीक विनंती केलेली नाही असे अमली पदार्थ विरोधी विभाग म्हणजेच NCB ने स्पष्ट केले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करताना ड्रग्ज प्रकरण समोर आलं. अमली पदार्थ विरोधी विभाग म्हणजे NCB कडून या प्रकरणात गुंतलेल्या बॉलिवूड कलाकारांची आता चौकशी सुरु आहे.
घाबरल्यामुळे दीपिकाला पॅनिक अटॅक येऊ शकतो, त्यामुळे चौकशीच्यावेळी तिच्यासोबत उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, यासाठी रणवीर सिंगने एनसीबीला लिखित विनंती केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण रणवीर किंवा स्वत: दीपिकाने अशी कोणतीही विनंती केली नसल्याचे NCB ने स्पष्ट केले आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून सुरु असलेल्या चौकशीत दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दिया मिर्झा या कलाकारांची नावे समोर आली होती. याच प्रकरणात चौकशीसाठी एनसीबीनं दीपिकाला समन्स बजावल्यानंतर ती चौकशीसाठी काल रात्री पती रणवीरसह गोव्याहून मुंबईमध्ये दाखल झाली आहे.