14 December 2019

News Flash

मुंबईतील हरित पट्टे कमी होत आहेत

मुंबई शहरातील हरित पट्टे मोठय़ा प्रमाणावर कमी होत असून मुंबईसाठी ही चिंताजनक बाब आहे

‘भामला फाऊंडेशन’ आयोजित पर्यावरणविषयक जागृतीच्या कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत करताना संस्थेचे अध्यक्ष आसिफ भामला

पर्यावरणतज्ज्ञ आसिफ भामला यांची खंत

मुंबई शहरातील हरित पट्टे मोठय़ा प्रमाणावर कमी होत असून मुंबईसाठी ही चिंताजनक बाब आहे आणि याला शहरातील बांधकाम व्यावसायिक जबाबदार असल्याचे दिसून येत असल्याचे परखड मत पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या ‘भामला फाऊंडेशन’चे अध्यक्ष आसिफ भामला यांनी व्यक्त केले. ५ जूनच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्यांच्या संस्थेकडून मोठय़ा प्रमाणावर पर्यावरणविषयक जनजागृतीचे काम करण्यात येणार असून याकरिता आयोजित विशेष कार्यक्रमाबद्दल माहिती ‘लोकसत्ता’ला देताना त्यांनी वरील खंत बोलून दाखवली.

‘भामला फाऊंडेशन’तर्फे दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईत पर्यावरणविषयक जागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून यंदाचे संस्थेचे आठवे वर्ष आहे. संस्थेच्या आजवरच्या कामाबद्दल सांगताना आसिफ भामला यांनी सांगितले की, आगामी काळात पाण्याचे व कचऱ्याचे योग्य रीतीने व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

पाण्याचे व्यवस्थापन करताना पर्जन्य जलसंवर्धन करणे आवश्यक आहे. यासाठी उपाय म्हणून आम्ही गेल्या वर्षभरात मुंबईतील पन्नास शाळांमध्ये जाऊन जनजागृती केली असून उत्तर-मध्य मुंबईतील बांद्रा (पूर्व), बांद्रा (पश्चिम) आणि कलिना आदी मतदारसंघांतील प्रत्येक इमारतीत जाऊन पर्जन्य जलसंवर्धन कसे करावे तसेच घरातील कचऱ्याचे वर्गीकरण कसे करावे याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. यामागचे सध्याचे प्रमुख कारण असे की, देवनार कचराभूमीचा कचरा वाढत असून कचऱ्याची विल्हेवाट ही सोसायटय़ांनी लावणे आता क्रमप्राप्त झाले आहे. त्यामुळे कचऱ्याबद्दल जागृती आम्ही वेगाने करत आहोत. यासाठी प्रत्येक सोसायटीत पुढील कचरा विल्हेवाटीची योजना राबवणार असून सुक्या व ओल्या कचऱ्याचे विघटन करणारी यंत्रणा आम्ही बसवणार आहोत. याकरिता आम्ही मुंबई महापालिकेशीही संलग्न झालो असून त्यांचे सहकार्य लाभत असल्याचे भामला यांनी सांगितले. मात्र मुंबईतील नाल्यांमध्ये आढळणाऱ्या थर्माकोल, प्लास्टीक याचा वापर थांबण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजे असतानादेखील पालिकेकडून दुर्लक्ष करण्यात येते. ही चुकीची बाब असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

५ जूनच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांचा सत्कार तसेच पर्यावरण विषयावर चर्चासत्रे आणि मुलांच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच उद्योग, सिनेजगत व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाचे आकर्षण असल्याचे भामला यांनी स्पष्ट केले.

First Published on May 27, 2016 2:02 am

Web Title: reducing green belt in mumbai
टॅग Environment
Just Now!
X