रस्ते घोटाळाप्रकरणी बडतर्फीची कारवाई?

मुंबईमधील ३४ रस्त्यांच्या कामांमध्ये झालेल्या घोटाळा प्रकरणात पालिकेच्या रस्ते विभागातील तब्बल १०० अभियंत्यांवर ठपका ठेवण्यात आला असून येत्या ३ अथवा ४ जानेवारी रोजी या अभियंत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. या घोटाळ्यात अडकलेल्या काही अभियंत्यांना थेट बडतर्फ करण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ २०० रस्त्यांच्या कामात झालेल्या घोटाळ्यांचा अहवालही ३१ डिसेंबर रोजी पालिका आयुक्तांना सादर करण्यात येणार असून ३४ रस्त्यांमधील घोटाळेबाज अभियंते २०० रस्त्यांच्या कामातही दोषी आढळले आहेत. त्याशिवाय आणखी काही अभियंत्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नालेसफाईप्रमाणे रस्त्यांच्या कामांमध्ये घोटाळा होत असून रस्ते कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारे गोपनीय पत्र माजी महापौर स्नेहल आंबेकर यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पाठविले होते. या पत्राची गंभीर दखल घेत पालिका आयुक्तांनी रस्ते कामांच्या चौकशीचे आदेश दिले होते. पहिल्या टप्प्यामध्ये ३४ रस्त्यांच्या कामांची चौकशी करण्यात आली. चौकशीमध्ये रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे उघड झाले. रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता अशोक पवार आणि दक्षता विभागाचे प्रमुख अभियंता उदयकुमार मुरुडकर यांच्यासह दोन अभियंत्यांवर ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले होते. पवार आणि मुरुडकर यांना कारावासही भोगावा लागला. या ३४ रस्त्यांच्या कामात दोषी आढळलेल्या सहा कंत्राटदारांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता ३४ रस्त्यांच्या घोटाळ्याचा अंतिम चौकशी अहवाल अजोय मेहता यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.

या चौकशी अहवालामध्ये तब्बल १०० अभियंत्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. या आरोपी अभियंत्यांवर कोणते गुन्हे नोंदवायचे व त्यांच्या शिक्षेचे स्वरूप काय असेल, याबाबत पालिका अधिनियम तपासून पाहिले जात आहेत. याबाबतचा संक्षिप्त अहवाल येत्या ३-४ जानेवारी रोजी आयुक्तांना सादर करण्यात येईल. गंभीर आरोप असणाऱ्या अभियंत्यांना पालिकेच्या सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

पालिका आयुक्तांकडे ३४ रस्त्यांच्या घोटाळ्याचा अंतिम अहवाल सादर झाला असून नववर्षांच्या पूर्वसंध्येला म्हणजे ३१ डिसेंबर २०१७ रोजी २०० रस्त्यांच्या घोटाळ्याचा अहवाल अजोय मेहता यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. ३४ रस्त्यांच्या घोटाळ्यात ठपका ठेवण्यात आलेल्या १०० अभियंत्यांमधील काही जणांचा २०० रस्त्यांच्या घोटाळ्यात सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. एकूणच रस्ते घोटाळ्यामध्ये रस्ते विभागातील बहुसंख्य अभियंत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येण्याची शक्यता आहे.

अभियंत्यांची संघटना न्यायालयात जाणार

रस्ते घोटाळ्यात अडकलेल्यांविरोधात होणाऱ्या कारवाईमुळे पालिकेतील अभियंते बिथरले आहेत. अनेक वेळा वरिष्ठांच्या कृत्यामुळे अभियंत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. काही अभियंते विनाकारण भरडले जात आहेत, असा मुद्दा अभियंत्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे रस्ते घोटाळ्यात कारवाईचा बडगा उगारण्यात आल्यानंतर त्याविरोधात न्यायालयात धाव घेण्याची तयारी अभियंत्यांच्या संघटनेने सुरू केली आहे, असेही या पदाधिकाऱ्याने सांगितले.