News Flash

रस्तेकामांची रखडपट्टी

महापालिकेकडून रस्ते बांधण्याची तसेच रस्त्यांचा पृष्ठभाग नीट करण्याची कामे हाती घेण्यात येतात.

केवळ १३७ किलोमीटर रस्त्यांची कामे पूर्ण; महापालिकेच्या कासवगती कारभाराचा फटका

शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी महापालिका पावसाळाअखेरपासून तब्बल ७८० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे हाती घेणार आहे. मात्र मागच्या वर्षी हाती घेतलेल्या ६०० किलोमीटरपैकी केवळ १३७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचीच कामे पूर्ण झाली आहेत. महानगरपालिकेचा कासवगती वेग आणि त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून रस्त्यांच्या कामांना मिळणारी परवानगी यांचे गणित लक्षात घेता पालिकेने हाती घेतलेली कामे पूर्ण होण्यासाठी आणखी चार वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

दरवर्षी महापालिकेकडून रस्ते बांधण्याची तसेच रस्त्यांचा पृष्ठभाग नीट करण्याची कामे हाती घेण्यात येतात. दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१५-१६ या वर्षांत पालिकेने सुमारे ५५० रस्त्यांची कामे हाती घेतली होती. या वर्षी फेब्रुवारीत झालेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर २०१६-१७ या आर्थिक वर्षांत तब्बल ११०० रस्ते पूर्णत: नव्याने बांधण्याची कंत्राटे देण्यात आली. त्याचवेळी खड्डे पडू नयेत यासाठी सुमारे एक हजार रस्त्यांच्या पृष्ठीकरणाचे काम करण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले. प्राधान्याने करायच्या ११२ रस्त्यांपैकी जूनपर्यंत १०७ रस्ते पूर्ण झाले असले तरी इतर रस्ते याबाबत सुदैवी ठरले नाहीत. शहरातील वाहनांची गर्दी तसेच एकाचवेळी अनेक रस्ते बंद करता येणार नसल्याने वाहतूक विभागाने महापालिकेला तीन टप्प्यात परवानगी देण्याचे ठरवले. मात्र  पहिल्या टप्प्यात सुरू केलेल्या रस्त्यांची कामेही त्याखालून जात असलेल्या जलवाहिन्या, गटारे यांच्या कामांमुळे रखडली. त्यातच रस्तेघोटाळ्यानंतर कंत्राटदारांकडून सुरू झालेला असहकार व खडींची चणचण यामुळे रस्तेकामे आणखी मंदगतीने सुरू राहिले. त्यामुळे हाती घेतलेल्या ११७९ प्रकल्प रस्त्यांपैकी केवळ ३४४ रस्त्यांची कामे जूनपर्यंत पूर्ण झाली तर प्राध्यान्यक्रमात दुसऱ्या स्थानावर असलेल्या ९२८ रस्त्यांपैकी अवघे ११० रस्तेच पूर्ण होऊ शकले. त्यामुळे उर्वरित ८३५ प्रकल्प रस्ते, प्राधान्यक्रमावरील पाच रस्ते, दुसऱ्या प्राधान्यक्रमावरील ८२८ रस्त्यांचे काम ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात येणार आहे.

आणखी ४ वष्रे लागणार?

मागच्या वर्षीच्या या प्रलंबित कामांसोबतच पालिका यावेळी आणखी ६६४ रस्त्यांच्या कामांच्या निविदाही काढणार आहे. यात ८८ किलोमीटर लांबीचे २७० रस्ते असून ९४ किलोमीटर लांबीच्या ३९४ रस्त्यांची पृष्ठीकरणाची कामेही सुरू करण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यामुळे प्रलंबित कामे व नवीन रस्तेकाम पाहता यावेळी तब्बल २८९३ रस्त्यांची कामे करणार असल्याचा दावा महापालिकेने केला असून या रस्त्यांची एकत्रित लांबी तब्बल ७८० किलोमीटर आहे. शहरातील एकूण रस्त्यांची लांबी १९०० किलोमीटर असून मेट्रोच्या कामांमुळे अनेक रस्ते खोदले गेले असताना महापालिकेच्या रस्तेकामांना वाहतूक पोलिसांकडून परवानगी मिळण्याची शक्यताच कमी आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या गेल्या चार वर्षांतील रस्तेकामांचा वेग पाहता एका वर्षी सुमारे १०० ते १२५ किलोमीटर रस्त्यांचीच कामे पूर्ण होतात. या पाश्र्वभूमीवर पालिकेने हाती घेतलेल्या रस्त्यांची सर्व कामे होण्यासाठी आणखी चार वर्षे तरी लागतील.

रस्त्यांची भरमसाट कामे हाती घेऊन वर्षअखेर त्यातील अर्धीही कामे करायची नाही हा पालिकेचा नेहमीचा शिरस्ता आहे. शहरातील एकूण रस्त्यांपैकी एक तृतियांश रस्ते खोदण्याचे पालिकेने या वर्षी ठरवले आहे. ही कामे पूर्ण होणार नाहीत हे पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही माहीत आहे. मात्र एवढी वर्षे काम पूर्ण करण्यात अपयश येऊनही ही कामे करण्याच्या प्रकारात काही बदल करावा, काही वेगळा विचार करावा, नवी पद्धत अवलंबवावी, नव्या लोकांना काम द्यावे असे पालिकेला सुचत नाही.

अशोक दातार, वाहतूकतज्ज्ञ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 3:47 am

Web Title: road work issue in mumbai bmc
Next Stories
1 विकासकांकडून झाडांची विनापरवाना कत्तल
2 ९ हजार इमारतींचा पुनर्विकास आवश्यक
3 ‘मेट्रो-३’च्या भुयारी खोदकामाला स्थगिती
Just Now!
X