प्रतीक्षा नगर येथील आणिक बस डेपो समोरील सीएनजी पंपावर सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात वडाळा टी. टी. पोलिसांना यश आले आहे. मो. शाहजादा मो. शरीफ शेख (२३), मोहम्मद शहाबाज खान (२३), मो. नदीम अहमद (१९), मो. अनिस खान (२१), इजाज अली चौधरी (१९) अशी अटक केलेल्यांची नावे असून ते वडाळ्याच्या संगम नगरचे रहिवाशी आहेत. झडतीवेळी त्यांच्याजवळून २ कोयते, २ मोठे सुरे व दोरखंड आदी हत्यारे व अन्य सामान सापडले असून या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर सशस्त्र दरोडय़ाचा गुन्हा दाखल केला आहे.

शुक्रवारी मध्यरात्री काही सशस्त्र दरोडेखोर आणिक बस डेपो समोरील सीएनजी पंपावर दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती वडाळा टी. टी. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे यांना मिळाली. त्यानुसार कांबळे यांनी तत्काळ सहायक पोलीस निरीक्षक संतोष नरुटे व प्रकाश िलगे यांना आपल्या पथकासह घटनास्थळावर पाळत ठेवण्याचे आदेश दिले. त्या आदेशानुसार मध्यरात्रीच्या अंधारात सीएनजी पंपालगत पोलिसांनी पाळत ठेवली. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पाच दरोडेखोर पंपावरील रोकड लुटण्याच्या तयारीत आले असताना पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालून त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांची कसून चौकशी केली असता पंपावरील रोकड लुटण्यासाठी आल्याचे त्यांनी कबूल केले. यामधील २ आरोपी पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांनी याची गंभीर दखल घेत पुढील तपास सुरू केला आहे.