बांधकाम क्षेत्रात बडे प्रस्थ असलेल्या डीएसकेंनी (डी.एस.कुलकर्णी) केलेल्या फसवणुकीविरुद्ध मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत सात कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. फसलेल्या गुंतवणूकदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असून संबंधितांनी आर्थिक गुन्हे विभागाच्या गृहनिर्माण विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे पोलिसांनी याआधीच या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुणे पोलिसांनी डीएसके यांच्या मुंबईतील कार्यालये तसेच निवासस्थानी छापे टाकले आहेत. मुंबई पोलिसांकडूनही या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली असून पुणे पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आहे. डी. एस. कुलकर्णी उद्योगसमूहाची मुदत ठेवींची जाहिरात वाचून हे गुंतवणूकदार भुलले होते.

पुणे येथील घरकुल लॉन्स येथे झालेल्या सेमिनारमध्ये या योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. या योजनेला रिझव्‍‌र्ह बँकेची परवानगी असल्याची माहिती त्या वेळी देण्यात आली होती. त्यावर विश्वास ठेवून शेकडो वयोवृद्ध नागरिक तसेच महिलांनी गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीवर सुरुवातीला व्याज मिळाले. मात्र गेले वर्षभर व्याज मिळणे बंद झाले होते. त्या वेळी स्वत: डी. एस. कुलकर्णी यांच्या वतीने पत्र पाठवून माहिती देण्यात आली होती. पुढील तारखांचे धनादेशही देण्यात आले. परंतु धनादेश न वटल्याने गुंतवणूकदार हैराण झाले. तरीही लवकरच पैसे देण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते.