नागपूर : जन्मशताब्दी वर्ष जवळ येत असताना परिवाराच्या विस्ताराच्या दिशेने आता संघाची वाटचाल सुरू झाली असून सरसंघचालक मोहन भागवत यांच्या शेअर बाजारातील कार्यक्रमाकडे याच भूमिकेतून बघितले जात आहे. या बाजाराशी जोडलेला व अर्थसाक्षर असलेल्या मोठय़ा वर्गाला परिवाराशी जोडण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत.

बाळासाहेब देवरसांच्या काळात जन्माला आलेला वनवासी कल्याण आश्रम, रज्जू भैयांच्या काळात निर्माण झालेली इंटरनेट शाखेची संकल्पना तर सुदर्शनजींच्या काळात सुरू झालेल्या लघुउद्योग भारतीचा अपवाद वगळता अलीकडच्या काही दशकात संघात नवसृजनाचे प्रकार फारसे घडले नाहीत. मोहन भागवतांकडे संघाची धुरा आल्यानंतर त्यांनी परिवारात असलेल्या अनेक संघटनांमध्ये असलेला विसंवाद दूर करण्याला प्राधान्य दिले. या माध्यमातून परिवाराचे एकात्मीकरण करण्यात त्यांना बऱ्यापैकी यश आले. आता त्यांची पावले ज्या क्षेत्रात संघाचे फारसे काम नाही अशा क्षेत्राकडे वळू लागली असून मुंबईतील कार्यक्रम त्याचाच एक भाग असल्याचे संघवर्तुळात बोलले जात आहे. गेल्या दोन दशकात देशात अर्थसाक्षरांचा एक नवा वर्ग उदयाला आला आहे. शेअर बाजार, म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर या वर्गाचा भर आहे. या वर्गाची मते आधुनिक आहेत. शिवाय तो भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जातो. त्याला जवळ करण्यासाठी संघाने आता पावले उचलायला सुरुवात केली आहे. संघ परिवारातील विविध संघटनांचा वावर समाजातील सर्व घटकात असावा, या दृष्टीने संघाने अनेकदा नवनव्या संकल्पना अमलात आणल्या आहेत. १९७३च्या आधी दत्तोपंत ठेंगडीच्या नेतृत्वात भारतीय मजदूर संघाची स्थापना झाली. १९९२ ला ही जगातील सर्वात मोठी कामगार संघटना म्हणून ओळखली गेली. नंतर ठेंगडी यांनी भारतीय किसान संघ, समरसता मंच, स्वदेशी जागरण मंच या संघटना सुरू केल्या. बदलत्या प्रवाहात या संघटनांच्या मर्यादा हळूहळू स्पष्ट होत गेल्या. आता असंघटित  कामगारांचे क्षेत्र कमालीचे वाढले आहे, पण या क्षेत्रात काम करणारी संघाची संघटनाच नाही. शेअर बाजाराशी जोडला गेलेला मोठा वर्ग समाजात आहे. त्यांना एकत्रित आणणारे व्यासपीठ संघाजवळ नाही. या उणिवा लक्षात घेऊन आता संघाने सर्वात आधी अर्थसाक्षरांना जवळ करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या वर्गात ग्राहकांची संख्या खूप असली तरी त्यांना भेडसावणारे प्रश्न संघ परिवारातील एक संघटना असलेल्या ग्राहक पंचायतीच्या आवाक्याबाहेरचे आहेत. हे लक्षात घेऊनच या नव्या उपक्रमाची आखणी करण्यात आली असून सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळेंच्या नेतृत्वात एक चमू यासाठी झटत असल्याची माहिती संघातील सूत्रांनी दिली. अर्थकारणात रस असलेले तसेच माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणारे सुशिक्षित तरुण कामाच्या व्यापामुळे संघ शाखेत येणार नाहीत याची कल्पना संघाला आहे. त्यामुळे त्यांना परिवाराशी जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सोबतच संघाने आता खासगी आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी, बँक ग्राहक अशा वर्गाला प्रबळ करण्यासाठीही काही उपक्रम सुरू करायचे ठरवले आहे.

संघाला सर्वच क्षेत्रांत स्थान हवे

काळाच्या ओघात परिवारातील अनेक संघटनांचे हेतू व उद्दिष्टे कालबाह्य़ ठरू लागतात. हा धोका लक्षात घेऊन सरसंघचालक मोहन भागवतांनी अर्थसाक्षर वर्गाला जवळ करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. संघात याला युगानुकूल संघटना उभारणी असे म्हटले जाते. जन्मशताब्दी वर्षांत संघ सर्वच क्षेत्रात असावा, हा भागवतांचा उद्देश आहे व त्याच्या पूर्तीसाठी सध्या कधी नव्हे एवढे अनुकूल वातावरण देशात आहे. ही पाश्र्वभूमी लक्षात घेऊनच भागवतांच्या शेअर बाजारातील कार्यक्रमाकडे बघायला हवे.

– दिलीप देवधर, संघाचे अभ्यासक

‘हिंदू इकॉनॉमिक्स’ आणि देवरस

संघाची आर्थिक धोरणासंबंधीची निश्चित अशी भूमिका नाही, असे बाळासाहेब देवरस नेहमी म्हणायचे. ज्या भूमिकेमुळे हिंदूंचे हित साधले जाईल तो मार्ग स्वीकारा, असे ते सांगायचे. नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू म. वा. बोकारे यांनी प्राचीन काळातील वेद, उपनिषदातील अर्थविचार एकत्र करून हिंदू इकॉनॉमिक्स हे पुस्तक लिहिले व ते देवरसांना भेट दिले. तेव्हा त्यांनी वरील भूमिका मांडल्याची आठवण दिलीप देवधर यांनी सांगितली. आता काळाच्या ओघात संघाची ही भूमिका हळूहळू बदलेल, असे देवधर म्हणाले.