संदीप आचार्य

मुंबई: पंचवीशीतील ते तरुण झोपडपट्टीतील घराघरात जाऊन कोणाला ताप, खोकला आदी काही आजार आहे याची चौकशी करत होते…. दुसरीकडे डॉक्टर व तीन कार्यकर्त्यांचे पथक येणार्या लोकांची पल्स ऑक्सीमीटर व ताप मोजण्याच्या गनने तपासणी करत होते. अगदी शांतपणे त्यांचे काम सुरु होते. त्या वस्तीतील एकही घर सुटणार नाही याची हे तरुण काळजी घेत होते….

मुंबईतील विलेपार्ले, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, चेंबूर पासून धारावीपर्यंतच्या अनेक झोपडपट्टी व वस्त्यांमध्येवस्त्यांमधून ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे तरुण पदाधिकारी करोना संशयितांना शोधण्यासाठी स्क्रिनिंगचे काम करत आहेत. करोना रुग्णांच्या या तपासणीच्या कामात मुंबईत जवळपास एक हजाराहून तरुण स्वयंसेवकांनी स्वत: ला झोकून दिले आहे. संघाच्या ‘निरामय सेवा फाऊंडेशन’ च्या माध्यमातून अत्यंत शिस्तबध्द पद्धतीने हे काम सुरु आहे.

वीस ते तिशीच्या आगेमागे असलेल्या तरुणांनी आतापर्यंत मुंबईतील वीस वेगवेगळ्या वस्त्यात जाऊन जवळपास ७२ हजार लोकांची तपासणी केली. यात लक्षणे असलेले ९४२ रुग्ण आढळून आले असून त्यांची माहिती महापालिकेला लगेच कळवण्यात आली. याशिवाय धारावीत ४९ पथकांच्या माध्यमातून १०,८८७ लोकांची तपासणी करण्यात आली. यात १४४ लक्षणे असलेल्या रुग्णांना शोधून महापालिका अधिकाऱ्यांना पुढील उपचारासाठी कळवण्यात आले. यासाठी ५७२ संघाचे कार्यकर्ते कार्यरत होते.

याबाबत संघाचे मुंबईचे महानगर कार्यवाह संजय नगरकर यांनी विचारले असता ते म्हणाले, “लॉकडाउनच्या सुरुवातीपासून मुंबईत संघाने नियोजनबद्ध काम सुरु केले. सुरुवातीला आम्ही रोज दीड लाखाहून अधिक स्थलांतरित मजुरांना रोजच जेवण देत होतो. तसेच ८० हजाराहून अधिक धान्याची पाकिटे वाटली. त्यानंतर मुंबईतील रुग्णांची वाढत जाणारी संख्या लक्षात घेऊन गरीब वस्त्या व पालिकेला आवश्यक वाटणाऱ्या जागांच्या ठिकाणी रुग्ण तपासणीचे काम सुरु केले. त्याचप्रमाणे खासगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने सुरु करावे तसेच नर्सिंग होम्स सुरु व्हावी म्हणून पद्धतशीर प्रयत्न केले. यासाठी या डॉक्टरांना पीपीई किट, सॅनेटायझरपासून फ्युमिगेशनपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. अशाच सुविधा नर्सिंग होममध्येही देण्यात आल्या असून यातून मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली तसेच नवी मुंबईत १०७७ डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरु केले तर २४ नर्सिंग होम्स सुरु झाले” असे नगरकर यांनी सांगितले.स्क्रिनिंगचे को ऑर्डिनेटर म्हणून विकास देशमुख काम पाहतात. तर निरामय फाऊंडेशनचे रामेश्वर नाईक हेदेखील सहकार्य करत आहेत. डॉ. ज्ञानेश गवाणकर आणि डॉ. सोमय्या प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

“मुंबईत करोना व लॉकडाउनपासून संघाचे सुमारे पाच हजार कार्यकर्ते वेगवेगळ्या कामांमध्ये गुंतले आहेत. या साऱ्यात संघाच्या १४ तरुण कार्यकर्त्यांना करोनाची लागण झाली असून वीस वर्षाच्या एका तरुण कार्यकर्तीचा करोनामुळे मृत्यू झाला. वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन स्क्रिनिंगचे काम आगामी काळात अधिक जोरात केले जाणार आहे. या कामातील आमचा प्रत्येक कार्यकर्ता सलग दहा दिवस पालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी राहून काम करत असतो. स्क्रिनिंच्या दहा दिवसात एकदाही आमचा कार्यकर्ता त्याच्या घरी जात नाही, असे संजय नगरकरांनी सांगितले. संघ असाही प्रसिद्धीपासून कायम दूर राहातो मात्र कोणत्याही संकटकाळात जन सहाय्यासाठी संघ दक्षच असतो”, असे नगरकर यांनी सांगितले.