व्यावसायिक वाहनांच्या तपासणीत सुसूत्रता आणण्यासाठी प्रकल्प

मुंबईतील व्यावसायिक वाहनांच्या तपासणीत सुसूत्रता यावी यासाठी एसटीच्या कुर्ला आगारात आरटीओचे अद्ययावत असे स्वयंचलित तपासणी केंद्र उभे राहणार आहे. परिवहन विभागाच्या या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. हे केंद्र उभारणीसाठी १४ कोटी रुपये खर्च येईल.

रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, बेस्ट बस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाडय़ा यासह अन्य व्यावसायिक व अवजड वाहनांची आरटीओत तपासणी होते. प्रथम नवीन वाहन नोंदणी करताना तपासणी होते. त्यानंतर दुसरी तपासणी दोन वर्षांनी आणि मग दरवर्षी तपासणी केली जाते. ब्रेक, प्रदूषण, वाहनांचे सस्पेंशन, चाक, वेग, हेडलाईट इत्यादी तपासणी यात केली जाते. मात्र मानवी पद्धतीने होणाऱ्या तपासणीत बराच वेळ जातो. याशिवाय तपासणीत सुसूत्रताही येत नाही. मुंबई उच्च न्यायालयानेही वाहन तपासणीसाठी २५० मीटरचा ब्रेक टेस्ट ट्रॅक असणे आवश्यक असल्याचे आदेश दिले आहेत आणि त्यानुसार मुंबईतील आरटीओत वाहन तपासणीसाठी टेस्ट ट्रॅक उभारण्याची कार्यवाही सुरूही आहे.

परंतु मुंबईतील वाहनांची संख्या लक्षात घेता अद्ययावत असे स्वयंचलित वाहन निरीक्षण व परीक्षण केंद्र उभारणे गरजेचे असल्याने तसा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला. परिवहन विभागाकडून ऑक्टोबर २०१५ मध्ये नाशिकमधील पंचवटी परिसरात स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र उभारण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील एसटी महामंडळाच्या कुर्ला आगारातही अशीच यंत्रणा उभारण्यासाठी परिवहन विभागाने आपला प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला होता. त्याला शासनाने मंजुरी दिल्याची माहिती परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. पुण्यातील ऑटोमोटिव्ही रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेमार्फत केंद्र उभारले जाणार आहे. या केंद्राच्या देखभालीची जबाबदारी एसटी महामंडळाची असणार आहे.

एसटी आगाराची निवड का?

* कुर्ला आगाराचा परिसर हा खूपच मोठा असून सध्या एसटीच्या गाडय़ांच्या परिचालनाशिवाय अन्य कामे या परिसरात होत नाहीत.

* स्वयंचलित केंद्र उभे राहिल्यास दिवसाला जवळपास २०० पेक्षा जास्त वाहनांची तपासणी होईल.

* मानवी हस्तक्षेपाशिवाय वाहनांची तपासणी बारकाईने होणार आहे. स्वयंचलित तपासणी यंत्र, टेस्ट ट्रॅक याशिवाय अन्य मोठी यंत्रणा उभारली जाईल.

* आगारातील वाहतुकीत कोणतीही बाधा न येता केंद्र उभे राहील. केंद्रात तपासणीसाठी येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगचीही सोय असणार आहे.

* मुंबईबरोबरच ठाणे जिल्ह्यतील व्यावसायिक वाहनेही येथे येऊ शकतात. परिवहन विभागाकडून ठाणे जिल्ह्य़ातही व्यावसायिक वाहनांसाठी असेच एक केंद्र उभारण्याचा विचार आहे. त्यामुळे येथील वाहनांनाही मुंबईत येण्याची गरज भासणार नाही.