नाशिक जिल्ह्यातील तळेगावमध्ये काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात असंतोष पसरला होता. जाळपोळ, तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. अजनूही जिल्ह्यातील काही भागात तणावाचे वातावरण असून काही ठिकाणी संचारबंदीही लागू करण्यात आलेली आहे. या तणावाच्या स्थितीत सोशल मीडियावरून अनेक अफवा पसरवण्यात आल्या. फेसबुक, व्हॉटस्अप सारख्या सोशल मीडियावरून खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील सात ग्रूप अॅडमिनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे अनेक व्हॉटस्अॅप ग्रूप अॅडमीनचे धाबे दणाणले आहे. व्हॉटस्अपवरून अफवा पसरवल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली.
काही दिवसांपूर्वी तळेगावमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात तणावाचे वातावरण होते. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. एसटी महामंडाळाने आपल्या बस बंद ठेवल्या होत्या. तर प्रशासनाने इंटरनेट सेवा बंद केली होती. परंतु तत्पूर्वी काही ग्रूप व व्यक्तींनी अफवा पसरवणाऱ्या पोस्ट शेअर केल्याने तणावात वाढ झाली होती. त्यामुळे पोलिसांनी संबंधित ग्रूप अॅडमिनवर गुन्हे दाखल केले आहेत.
संबंधित ग्रूप अॅडमिनची चौकशी केली जात असून काही आढळल्यास कारवाई करू अशी माहिती पोलिसांनी दिली. गुन्हा दाखल केल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. पोलीस प्रशासनाने अशा पोस्ट शेअर न करण्याचे आवाहन केले आहे.