‘कुछ कुछ होता है’, ‘हर दिल जो प्यार करेगा’ आणि ‘बादल’ अशा चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या अभिनेत्री सना सईदच्या वडिलांचं निधन झालं आहे. दीर्घ आजारामुळे त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येत असून लॉकडाउनमुळे सनाची आणि वडिलांची अखेरच्या क्षणी भेटदेखील झाली नाही. २२ मार्च रोजी जनता कर्फ्युच्या दिवशी सनाच्या वडिलांचं निधन झालं.
काही दिवसापूर्वी सना लॉस एन्जलिस येथे गेली होती. मात्र लॉकडाउन असल्यामुळे तिला तेथेच अडकून रहावं लागलं. याच काळात तिच्या वडिलांचं निधन झालं. मात्र तिला अखेरच्या क्षणी वडिलांची भेट घेता आली नाही. सनाच्या वडिलांना कित्येक वर्षापासून मधुमेहाचा त्रास होता. याच आजारपणात त्यांचं निधन झालं आहे.
‘माझ्या वडिलांना मधुमेहाचा त्रास होता. त्यामुळे याचा परिणाम त्यांच्या शरीरावरही झाला होता. त्यांच्या शरीरातील काही भागांच्या हालचाली बंद झाल्या होत्या. मी लॉस एंजलिसमध्ये असताना सकाळी सात वाजता वडिलांचं निधन झाल्याचं मला समजलं. ही माहिती मिळाल्यानंतर मला घरी जाऊन माझ्या आई आणि बहिणीला बिलगून मन मोकळं करायचं होतं. मात्र ते शक्य नव्हतं. ज्या परिस्थितीत मी माझ्या वडिलांना गमावलंय ती परिस्थिती अत्यंत बिकट आणि कठीण आहे. मात्र माझे वडील किती वेदना सहन करत होते याची मला जाणीव आहे. त्यामुळे या सगळ्यातून त्यांची सुटका झाली. निश्चितच ते जेथे असतील तेथे चांगले असतील’, असं सनाने ‘हिंदुस्थान टाइम्स’शी बोलत सांगितलं.
दरम्यान, सना एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अमेरिकेत गेली होती.त्याच वेळी तिच्या वडिलांचं निधन झालं. विशेष म्हणजे या दिवशी देशात जनता कर्फ्यु असल्यामुळे वडिलांच्या अत्यंसंस्कारावेळीदेखील अनेक अडचणी आल्याचं तिने सांगितलं.