संदीप खरे कवी-गीतकार

माझ्या वाढदिवसाला बॅट-बॉल हवा, असे मी क्वचितच घरी मागितले असेल. वाढदिवसाला पुस्तकच दे, असा हट्ट मी आईकडे करायचो. त्यामुळे अनेकदा रद्दीमध्ये किलोवर मिळणारी पुस्तके आई माझ्यासाठी आणत असे. ‘चांदोबा’, ‘कुमार’, ‘किशोर’, ‘फास्टर फेणे’ हे माझे बालपणीचे मित्र. आपण एकावेळी एकच प्रकारचे आयुष्य जगतो. परंतु पुस्तके एका जन्मात माणसाला अनेक जन्म जगण्याची मुभा देतात, ते लेखनाच्या विविधतेमुळेच.

readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
Sharad pawar on loksatta agralekh
“मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?
Razmanama Mahabharata in Persian language
महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?

बा. भ. बोरकर, िवदा करंदीकर, सुरेश भट, आरती प्रभू यांची लेखनशैली समजून घेत मी पुस्तकांच्या दुनियेत मुक्त भटकंती करीत आहे. अशा कवींचे साहित्य कितीही वाचले तरी ते कधीच संपणार नाही. शाळेमध्ये एका वक्तृत्व स्पर्धेत शिवाजी सावंत यांची ‘मृत्युंजय’ कादंबरी मला बक्षीस मिळाली. ‘मृत्युंजय’सोबतच ‘स्वामी’, ‘छावा’, ‘झुंज’ या कादंबऱ्यांचे वाचन सुरू झाले. वाचन करताना पुस्तकांतून लेखक भेटतात. मला अनेकांची शैली आवडली असली, तरीही रहस्यकथा, विनोदी, चिंतनशील आणि कॉमिक्स विषयासंबंधी पुस्तके आवडतात. लहानपणी पुस्तकांचा संच घेणे परवडत नसल्यामुळे आता मी ‘फास्टर फेणे’सारख्या पुस्तकांचा संपूर्ण संच विकत घेतला आहे.

भावे प्रशालेमध्ये माझे शिक्षण झाले. तेव्हा रिकाम्या तासाला गोष्ट सांगण्याकरिता मीच असायचो. त्यामुळे मला आवडलेले पुस्तक मी आणून मी वर्गाला गोष्टी सांगायचो. पेंडसे बाई आणि पारसनीस सर यांच्यामुळे मी पुस्तकांच्या जवळ गेलो. त्यांनी मला वाचनाची गोडी लावली. खरंतरं इयत्ता चौथीपासूनच माझी कविता लेखनाला सुरुवात झाली. त्या वेळी घरच्यांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळेच कविता रंजक पद्धतीने रसिकांसमोर मांडणे मला शक्य झाले. कविता लेखनासाठी दृष्टी असणे गरजेचे आहे. आपण ९९ कविता वाचतो, तेव्हा कुठेतरी एखादी कविता लिहायला सुरुवात होते. लेखनाचे हे तारतम्य प्रत्येकाने पाळायला हवे.

लहानपणापासून मला वाचनाची आवड असल्याने माझ्या बुकशेल्फमध्ये केवळ कवितांच्या पुस्तकांचाच नाही, तर इतरही अनेक पुस्तकांचा संग्रह आहे. पुस्तकेआपल्या कल्पनाशक्तीला आव्हान देतात. त्यामुळे डोळ्यासमोर पुस्तकातील प्रसंग जसाच्या तसा उभा राहतो. दररोज किमान १० पाने वाचल्याशिवाय मला झोप येत नाही. त्यामुळे पुस्तके आणि वाचन हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. सध्या लहान मुले व्हिडिओ गेम, संगणक यात रमलेली दिसतात. परंतु आई-वडिलांनी त्यांच्यापर्यंत पुस्तके पोहोचविली तर ती मुलांच्या आयुष्यभराची साथी होतील. पुस्तके हाच आयुष्याचा परिपूर्ण आहार आहे. हा आहार माझ्या घरी मिळत गेला.

कविता हा माझ्या जवळचा साहित्यप्रकार असल्याने त्याविषयी अनेक कवींचे संग्रह मी वाचले. बा. भ. बोरकर यांच्या लेखनातील अचूक अर्थ, विदा करंदीकर यांचा रोखठोकपणा, सुरेश भट यांच्या गजलांमध्ये कवितेचा न हरविलेला अर्थ आणि आरती प्रभू यांच्या वेगळ्या अनुभवांची शिदोरी अशा निराळ्या शैली मी वाचनातून अनुभवल्या.

आपणही काहीतरी सकस साहित्य लिहू शकतो, हे वयाच्या ३०व्या वर्षी उमगले आणि ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ची निर्मिती झाली. वाचनातून मी अनुभवलेल्या जाणिवा कळत-नकळत कागदावर उतरत गेल्या. ‘तुझ्यावरच्या कविता’, ‘मौनाची भाषांतरे’, ‘नेणिवेची अक्षरे’ यातून लेखनाचा मीही छोटासा प्रयत्न करीत गेलो. तर ऑडिओ बुक्सच्या माध्यमातून रसिकांसमोर कविता याव्यात यासाठी माझे प्रयत्न सुरूच आहेत. अनेकांनी भेट दिलेली पुस्तके मी संग्रहात ठेवत गेलो. आप्पा बळवंत चौकातील रसिक साहित्यच्या ग्रंथालयामध्ये मी आवर्जून जातो. प्रदर्शनांतून आणि रद्दीच्या दुकानातून दुर्मीळ पुस्तके खरेदी करायला मला आवडते. ‘माझी जन्मठेप’, ‘मी कसा झालो’, ‘कऱ्हेचे पाणी’, ‘कुण्या एकाची भ्रमणगाथा’, ‘नर्मदे हर हर’ अशी विविध पुस्तके मी वाचली आहेत. कवितांच्या कार्यक्रमांच्यानिमित्ताने अनेकदा पुण्यातून बाहेरगावी आणि परदेश दौरेही झाले. ज्यांच्या घरी मी मुक्कामाला गेलो, त्यांच्याकडे पुस्तकांचा संग्रह असे. त्यामुळे नवी आणि वेगळी पुस्तके वाचण्याचा मी त्या वेळीही आनंद घेत गेलो. सुहास शिरवळकर, नारायण धारप, भालचंद्र नेमाडे, श्री. ना. पेंडसे, श्याम मनोहर यांचे साहित्य मी वाचले. त्यामुळेच शेरलॉक होम्स, गगनी उगवला सायंतारा, बूमरँग, श्री मनाचे श्लोक, अभिनेत्री, मूव्ही मेकर्स, देवगंधर्व, न पाठवलेलं पत्र, एक होता गोल्डी, शेक्सपियर, सिनेमा के बारे में, मुसाफिर यांसारखी विविध पुस्तके माझ्या बुकशेल्फमध्ये आहेत. भाषेची रूपे, शब्दांचे पैलू समजून घेण्याकरिता प्रत्येकाने बालवयापासून सातत्याने वाचन करायला हवे.