राज्यसभेच्या निवडणुकीत सातवी जागा कोण पटकवणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता असतानाच पुण्यातील बडे बांधकाम व्यावसायिक संजय काकडे यांनी पूर्ण तयारीनिशी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन वर्षांंपूर्वी शरद पवार यांच्या हस्तक्षेपामुळे अपूर्ण राहिलेले राज्यसभेवर जाण्याचे स्वप्न यंदा पूर्ण व्हावे अशी त्यांची इच्छा असली तरी कोणी ताकदवान रिंगणात उतरल्यास चुरस निर्माण होणार आहे.
संजय काकडे यांच्या अर्जावर दहा अपक्ष आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. १० ते १५ अपक्ष आमदार, शिवसेना आणि भाजपची अतिरिक्त मते तसेच मनसेच्या मतांचे गणित जुळविण्याचा काकडे यांचा प्रयत्न आहे.
काँग्रेसमध्ये इच्छुकांची यादी प्रचंड मोठी
काँग्रेसमध्ये दोन जागांसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. मुरली देवरा आणि हुसेन दलवाई या विद्यमान सदस्यांचा पुन्हा उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादीने अल्पसंख्याक उमेदवार दिल्याने काँग्रेसलाही अल्पसंख्याक उमेदवार डावलता येणार नाही. सुबोध मोहिते, रोहिदास पाटील, हरिभाऊ राठोड, मुश्ताक अंतुले, जहिर काझी, कमलताई व्यवहारे, निर्मला सामंत-प्रभावळकर आदी इच्छुक आहेत. काँग्रेसचे उमेदवार सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. पक्षाकडे नऊ अतिरिक्त मते असली तरी की कोणाला द्यायची याचा अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
भाजपची शनिवारी बैठक
भाजपच्या उमेदवाराचे नाव निश्चित करण्याकरिता पक्षाच्या संसदीय मंडळाची शनिवारी नवी दिल्लीत बैठक होत आहे. तत्पूर्वी, शुक्रवारी प्रदेश भाजपच्या नेत्यांची बैठक होत आहे. प्रकाश जावडेकर हे निवृत्त होत असून त्यांनाच पुन्हा संधी दिली जाईल अशी शक्यता आहे.