गळचेपीविरोधात देशव्यापी लढा
देशातील ढासळती वैज्ञानिक विचारसरणी आणि विज्ञान संस्थांच्या निधीत होणारी कपात या निषेधार्थ ९ ऑगस्ट रोजी सर्व राज्यांमधील राजधानीच्या शहरात निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईत हा मोर्चा आझाद मैदान ते विल्सन महाविद्यालय या मार्गावर दुपारी ३.३० वाजता काढण्यात येणार आहे.
देशातील उच्चपदस्थांकडून अ-वैज्ञानिक गोष्टींना विशेष महत्त्व दिले जात आहेत. देशात सामूहिक मारहाण, ऑनर किलिंगसारख्या घटना घडत असताना त्यातून देशाला बाहेर काढण्यासाठी विज्ञानच मदत करणार आहे; पण याच विज्ञानाची गळचेपी सुरू आहे. याविरोधात सर्व वैज्ञानिकांनी एकत्रित येऊन दाद मागणे आवश्यक आहे, अशी भूमिका देशभरातील वैज्ञानिकांच्या ब्रेक थ्रू फाऊंडेशन या समूहाने केली आहे. या सर्वाचा निषेध म्हणून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यात जागतिक पातळीवर वैज्ञानिकांनी असेच एक आंदोलन केले होते. याचाच आधार घेत देशात हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात वैज्ञानिक, संशोधक, शिक्षक, विद्यार्थी यांनी एकत्रित यावे, असे आवाहन या वैज्ञानिकांच्या गटाने केले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तीन टक्के तरतूद करावी व शिक्षणासाठी दहा टक्क्यांची तरतूद करावी, अशी मागणी या वैज्ञानिक समूहाने केली आहे. देशात सुरू असलेल्या अवैज्ञानिक गोष्टींचा प्रचार तातडीने थांबवावा तसेच धार्मिक असहिष्णुताही थांबवावी, अशी मागणीही या समूहाने केली आहे. याउलट देशात वैज्ञानिक वातावरण निर्माण करून मानवी मूल्यांची जपणूक करावी, असे आवाहनही यात करण्यात आले आहे. शिक्षणामध्ये विज्ञाननिष्ठ संकल्पनांनाच स्थान द्यावे व पुरावा असलेल्या वैज्ञानिक धोरणांचाच आपण स्वीकार करावा, अशीही या वैज्ञानिकांची प्रमुख मागणी आहे.
वैज्ञानिकांचा हा मोर्चा कोणत्याही पक्षाविरोधात किंवा व्यक्तीविरोधात नाही. हा मोर्चा अवैज्ञानिक विचारसरणीच्या विरोधात आहे. आपल्या फोनमध्ये आलेले ‘प्राचीन भारतीय वैज्ञानिक चमत्कार’ किंवा ‘आज रात्री घातक किरणे आपल्यावर येणार’ वा तत्सम मेसेजेस स्वत: तपासून न पाहता फॉरवर्ड करणे हेदेखील अवैज्ञानिक दृष्टीचे लक्षण आहे. प्रत्येक चालीरीतीला मारूनमुटकून विज्ञानाच्या परिघात आणण्याचा आटापिटा करणे हीदेखील अवैज्ञानिक विचारसरणी आहे. अशी विचारसरणी समाजात वाढीस लागणे हे पुढच्या पिढीच्या दृष्टीने घातक आहे. या सर्वाविरोधात हा मोर्चा आहे. – प्रा. अनिकेत सुळे, वैज्ञानिक