आधीच प्रचंड आर्थिक चणचणीत असलेल्या बांधकाम उद्योगातील एका बडय़ा विकासकाने रोकड सुलभता निर्माण व्हावी, यासाठी आपले दक्षिण मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी असलेले घर कमी बाजारभावाने विकल्याची घटना समोर आली आहे. बांधकामे पूर्ण करण्यासाठी रोकड उपलब्ध नाही झाल्यास आमच्याकडे घर किंवा कार्यालय विकण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असे अनेक विकासकांचे म्हणणे आहे.

दक्षिण मुंबईतील या बडय़ा विकासकाने नाना चौकातील एका उत्तुंग टॉवरमध्ये ३३ व्या मजल्यावर असलेले दोन हजार ३१६ चौरस फुटाचे आलिशान घर १६ कोटी रुपयांना विकले आहे. बाजारभावानुसार या घराची किमत २०.७८ कोटींच्या घरात आहे. याच टॉवरमध्ये २३ व्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशाने हे घर खरेदी केले आहे. एक कोटी सात लाख रुपये इतके मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे.

हे घर इतक्या कमी दराने का विकण्यात आले असे या विकासकाला विचारले असता त्याने रोकड सुलभता निर्माण व्हावी, यासाठी विकले असे उत्तर दिले. मात्र आपले नाव न छापण्याची विनंती केली.

बांधकाम व्यवसायात आलेल्या शिथिलतेमुळे विकासक सावध झाले आहेत. सध्या सुरू असलेल्या प्रकल्पावर बँकांकडून कर्ज घेण्याऐवजी आपल्या मालमत्ता विकून रोकड सुलभता निर्माण करण्यावर त्यांचा भर असल्याचे दिसून येते. याबाबत एक विकासक म्हणाले की, बांधकाम व्यवसायाबाबत सध्या अनिश्चिततेचे वातावरण आहे. घरांची विक्री पूर्णपणे बंद झाली आहे. ज्यांनी घरांची नोंदणी केली आहे त्यांनी हप्ते देण्यास असमर्थता दर्शविली आहे. अशावेळी आम्ही बँकांकडून कर्ज घ्यायचे म्हणजे व्याजाचा बोजा उचलावा लागेल. त्याऐवजी सध्या आपल्याकडील मालमत्ता विकून रोकड सुलभता निर्माण करणे फायदेशीर होणार आहे. भविष्यात बांधकाम व्यवसायात तेजी आली तर मालमत्ता पुन्हा घेता येतील, असेही या विकासकाने स्पष्ट केले.

कर्जाच्या परतफेडीची चिंता

करोनानंतर सारीच समीकरणे बदलली आहेत. ज्या वित्तीय संस्थांनी कर्ज दिले आहे त्यांनी प्रकल्पाची व्यवहार्यता पुन्हा सिद्ध करण्यास सांगितले आहे. करोनामुळे घरांचे दर कमी झाल्याने कर्जाची परतफेड कशी होणार, अशी चिंता या वित्तीय संस्थांना लागली आहे. त्यामुळे त्यांनी नव्याने व्यवहार्यता सिद्ध करण्यास सांगितले आहे. विक्री करावयाच्या घरांची किमत सध्या उतरल्याने दिलेल्या कर्जाची पुनर्रचना करण्यासही सुचविले जात असल्याकडे काही विकासकांनी लक्ष वेधले.

मालमत्तांचे दर आणखी रोडावतील!

करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे घरांचे दर १५ ते २० टक्के कमी झाले आहेत. ते आणखी किती कमी होतील याचा नेम नाही. पुढील वर्षभरात तरी बांधकाम उद्योग स्थिरावण्याची शक्यता वाटत नाही, असे काही विकासकांचे म्हणणे आहे. भविष्यात दर कोसळले तर घेतलेले कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न सध्या विकासकांना पडला आहे. त्यामुळे त्यांनी सावध भूमिका घेण्याचे ठरविले आहे.