पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री कसुरी आता शिवसेनेचे लक्ष्य
‘ऑब्झव्र्हर रिसर्च फाऊंडेशन’तर्फे (ओआरएफ) येत्या सोमवारी नेहरू तारांगणाच्या प्रांगणात पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि होणारे चर्चासत्र उधळून लावण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. पाकिस्तानातील नेते, अभिनेते अथवा अन्य कुणाचेही कार्यक्रम मुंबईसह महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असा निर्धार शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद मेहमूद कसुरीलिखित ‘नायदर ए हॉक नॉर ए डोव्ह : अॅन इनसाइडर्स अकाऊंट ऑफ पाकिस्तान्स फॉरेन पॉलिसी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि त्यावरील चर्चासत्राचे ‘ओआरएफ’तर्फे सोमवारी वरळी येथील नेहरू तारांगणाच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे.
‘ओआरएफ’ने पोलीस संरक्षणाची मागणी केल्यामुळे शिवसेना नेते संतप्त झाले असून कोणत्याही परिस्थितीत हा कार्यक्रम होऊ द्यायचा नाही, असा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे. भारतामध्ये दहशतवादी हल्ले आणि बॉम्बस्फोट घडविणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तान आश्रय देत आहे, दहशतवादी घडवीत आहे.
पाकिस्तानी सैनिकांकडून सीमावर्ती भागात अधूनमधून गोळीबार करण्यात येत असल्यामुळे निष्पाप भारतीयांना प्राण गमवावे लागत आहेत. या गोळीबारात भारतीय जवानही शहीद होत आहेत. असे असतानाही ‘ओआरएफ’ने पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा घाट घातला आहे. हा कार्यक्रम नेहरू तारांगणने तात्काळ रद्द करावा अन्यथा कार्यक्रम उधळून लावण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे विभागप्रमुख आशीष चेंबूरकर यांनी नेहरू तारांगणच्या संचालकांना पाठविलेल्या पत्रामध्ये दिला आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी परवेज मुशर्रफ असताना त्यांच्या मंत्रिमंडळात खुर्शिद मेहमूद कसुरी परराष्ट्रमंत्री होते. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सोमवारचा कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी दिला आहे. ‘ओआरएफ’ ठाम
या कार्यक्रमाला शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. मात्र हा कार्यक्रम कोणत्याही परिस्थितीत यशस्वी करण्याचा निर्धार ‘ओआरएफ’ने केला असून त्यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे.