साडेतीन किलोमीटरचे अंतर १० ते १५ मिनिटांत
वाहतुकीच्या कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी प्रशासनाने ‘बेस्ट’ पर्याय शोधला आहे. याचा भाग म्हणून वांद्रे-कुर्ला संकुलात बेस्ट बस गाडय़ांसाठी ‘स्वतंत्र मार्गिका’ सुरू करण्यात आली आहे. या माíगकेमुळे साडेतीन किलोमीटरचे अंतर अवघ्या १० ते १५ मिनिटांत कापले जाणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही मार्गिका सुरू करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांत बेस्टच्या प्रवासी संख्येत घट होत आहे. यात वारंवार वाहतूक कोंडीत अडकल्याने वेळेवर न पोहोचणाऱ्या बसगाडय़ा हे मुख्य कारण मानले जात आहे. यावर उपाय म्हणून बेस्ट प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी एमएमआरडीए आणि मुंबई महापालिका यांच्या अखत्यारीत येणाऱ्या काही रस्त्यांवर बेस्ट बस गाडय़ांसाठी स्वतंत्र माíगका राखीव ठेवण्याचा प्रस्ताव सादर केला होता. याला वाहतूक पोलिसांची परवानगी दिली असून बेस्ट गाडय़ांसाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील माíगकेला प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. ही पहिली स्वतंत्र माíगका असून यामुळे वेळेची बचत होणार आहे.
वांद्रे-कुर्ला संकुलात पहिली स्वतंत्र माíगका सुरू झाल्याने बेस्टच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.यामुळे वेळेचीही बचत होणार आहे. सध्या हा साडेतीन किलोमीटरचा मार्ग गर्दीच्या वेळेस पार करण्यासाठी किमान ४० ते ४५ मिनिटांचा कालावधी लागतो, मात्र हेच अंतर १० ते १५ मिनिटांत पार करता येणार आहे, असे बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले.

६० बस गाडय़ा धावणार
वांद्रे-कुर्ला संकुलातील स्वतंत्र माíगकेमुळे वेळेची बचत होण्यासह सध्याच्या तुलनेत अधिक बस गाडय़ा धावू शकतील. या माíगकेवरून प्रति तास सुमारे ६० ते १०० बस गाडय़ा धावण्याची शक्यता असल्याचे वाहतूक अभ्यासक सांगत आहे.

दुसरा टप्पा (ऑगस्ट महिन्यात)
हाजी अली ते वरळी नाका, पश्चिम द्रुतगती महामार्ग, जोगेश्वरी ते बोरिवली जोडरस्ता, सुमननगर ते शीव.
तिसरा टप्पा
घाटकोपर ते मानखुर्द लिंक रोड, ओशिवरा ते मालवणी, जोगेश्वरी ते विक्रोळी जोडरस्ता.
फायदे
वेळेची बचत होईल.
एकाच वेळी जास्त बस गाडय़ा धावू शकतील.
बस गाडय़ांच्या फेऱ्या वाढतील.
इतर वाहनाच्या तुलनेत प्रवास जलद व स्वस्तात होईल.
डबल डेकरला फांद्यांची अडचण
सध्या या मार्गावर साध्या बस गाडय़ा धावत आहेत, मात्र या मार्गावर डबल डेकर बस चालवण्यासाठी अडचणी येत आहेत. याचा फटका २५ ते ३० डबल डेकर बस गाडय़ांना बसत आहे, मात्र लवकरच यावर तोडगा काढण्यात येणार आहे.
‘ट्राफिक वार्डन’ कार्यरत
स्वतंत्र मार्गिका पूर्णपणे बेस्ट बस गाडय़ांसाठी असल्याने रस्त्याची शिस्त मोडणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी ‘ट्राफिक वार्डन’ असणार आहेत. यात एखाद्याने नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.