येत्या काही वर्षांमध्ये मुंबई महानगर प्रदेशात वाहतूकविषयक अनेक पायाभूत सुविधांची कामे एकाच वेळी सुरू होणार आहेत. हे सर्वच प्रकल्प अवाढव्य असल्याने मुंबईच्याच नाही, तर एकूणच या महानगर प्रदेशाच्या वाहतुकीचा नकाशा पुढील वर्षांमध्ये बदलून जाणार आहे. सुखद प्रवासाच्या भविष्यासाठी पुढील किमान पाच वर्षे मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई येथील रहिवाशांना या विकासाच्या प्रसववेदना आणि प्रसवकळा सहन कराव्या लागणार आहेत..

रामायणात श्रीरामाच्या नेतृत्वाखाली वानरसेना लंकेत जाऊन धडकली. आता युद्धाशिवाय तरणोपाय नाही, हे रावणाला लक्षात आल्यानंतर त्याने आपल्या निद्राधीन झालेल्या भावाला, कुंभकर्णाला उठवण्याची धडपड सुरू केली. त्यासाठी मग ढोल, नगारे, ताशे, सनई अशी वाट्टेल ती वाद्ये वाजवणे चालू झाले आणि आळसावलेला कुंभकर्ण उठला.. मुंबई महानगर प्रदेशातील सध्याच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची अवस्था ही अशीच बराच काळ झोपून राहिलेल्या आणि अचानक युद्धाच्या तोंडावर खडबडून जाग्या झालेल्या कुंभकर्णासारखी आहे. येत्या वर्षभरात मुंबई महानगर प्रदेशात थोडीथोडकी नाही, तर १५ ते १६ मोठय़ा प्रकल्पांची कामे एकाच वेळी सुरू होणार आहेत.

मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोमार्गाचे जाळे विणण्यासाठी, महानगर प्रदेशात रस्त्यांची जोडणी उत्तम करण्यासाठी, रेल्वेचे अनेक मोठमोठे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी विविध योजनांची आखणी झाली आहे. गेल्या आठवडय़ात एमयूटीपी-३ या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्पांमध्ये आणखी तीन मोठय़ा प्रकल्पांची भर पडली आहे. ही सगळी कामे एकत्रितपणे सुरू झाली, की या प्रदेशात राहणाऱ्या अडीच-तीन कोटी लोकांची त्रेधातिरपीट उडणार आहे.

या प्रकल्पांपैकी डी. एन. नगर-दहिसर मेट्रो, अंधेरी पूर्व-दहिसर पूर्व मेट्रो, कुलाबा-वांद्रे-सीप्झ भुयारी मेट्रो या मेट्रो प्रकल्पांची प्रत्यक्ष कामे सुरू झाली आहेत. त्याशिवाय लवकरच वडाळा-ठाणे-कासारवडवली हा प्रकल्पही सुरू होणार आहे. या प्रकल्पांपैकी भुयारी मेट्रो प्रकल्प सोडला, तर उर्वरित प्रकल्पांच्या कामामुळे मुंबईच्या रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी अपेक्षित आहे. एमएमआरडीए आणि वाहतूक पोलीस यांनी ही कोंडी सोडवण्यासाठी नियोजन आराखडा तयार केला असला, तरी तो प्रत्यक्षात कितपत दिलासादायक ठरेल, याबाबत शंका आहे. विशेष म्हणजे दहिसर-अंधेरी दरम्यानचे दोन्ही मेट्रो प्रकल्प पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि लिंक रोड या महत्त्वाच्या रस्त्यांवरून जाणार आहेत. त्यामुळे ही कामे सुरू झाल्याने या दोन्ही मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी अनुभवायला मिळत आहे.

कुलाबा-अंधेरी-सीप्झ या भुयारी मेट्रोच्या स्थानकांमध्ये जाण्यासाठी व स्थानकांमधून बाहेर पडण्यासाठी रस्त्यांवर काही जागा घ्यावी लागणार आहे. सध्या हुतात्मा चौक, मुंबई सेंट्रल, आझाद मैदान, मेट्रो जंक्शन आदी ठिकाणी बॅरिकेड्स उभारून या मेट्रोची कामे सुरू झाली आहेत. प्रत्यक्षात मोठमोठय़ा यंत्रांनी जमिनीखाली भुयारे खोदण्याचे काम सुरू झाले की, या भुयारांमधून बाहेर पडणारे दगड-माती शहराबाहेर नेण्यासाठी मोठमोठे ट्रक कामाला लागतील आणि शहराच्या वाहतूक कोंडीत आणखी भर पडेल.

सध्या चालू असलेल्या रेल्वे प्रकल्पांमध्ये ठाणे-दिवा, सीएसटी-कुर्ला दरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेची उभारणी हे मोठे प्रकल्प आहेत. ठाणे-दिवा प्रकल्पातील कट-कनेक्शनच्या कामासाठी रेल्वेला आठ ते नऊ महा मेगा ब्लॉक घ्यावे लागणार आहेत.  त्यामुळे प्रवाशांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतील.

त्याशिवाय परळ टर्मिनसचे काम सुरू झाल्यानंतर कुर्ला ते परळ ंदरम्यान पाचवी-सहावी मार्गिका टाकण्यासाठी अनेक कामे पुढे येणार आहेत. त्यात महत्त्वाचे काम म्हणजे यांदरम्यान असलेला शीव स्थानकातील पूल, सायन हॉस्पिटलजवळील पूल आणि किंग्ज सर्कल येथील रेल्वे उड्डाणपूल यांचे पाडकाम आणि पुनर्बाधणी! हे काम आव्हानात्मक असून त्यासाठी डिसेंबर २०१८ची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. म्हणजे सलग दोन वर्षे मुंबईकरांना ‘आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद’ ही उद्घोषणा रेल्वेकडून वारंवार ऐकावी लागणार आहे.

एमयूटीपी-३ या योजनेत मान्य झालेले दोन मोठे प्रकल्प मुंबईबाहेर आहेत. त्यामुळे जागेची आणि कामासाठीच्या वेळेची मुबलक सोय या प्रकल्पांसाठी आहे. विरार-डहाणू चौपदरीकरण करताना सध्या धावणाऱ्या डहाणू लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ा यांचे वेळापत्रक गडबडणार आहे. पनवेल-कर्जत मार्गावर सध्या खूपच कमी गाडय़ा धावत असल्याने या मार्गाचे दुपदरीकरण करणे रेल्वेच्या दृष्टीने तुलनेने सोपे आहे.

या योजनेतील आव्हानात्मक प्रकल्प म्हणजे कळवा-ऐरोली उन्नत रेल्वे जोडमार्ग! ४२८ कोटी रुपयांचा हा प्रकल्प ठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या प्रकल्पाबरोबरच पूर्ण करण्याचे रेल्वेचे नियोजन असल्याचे समजते. कळवा, पारसिक येथील झोपडपट्टय़ा आणि अनधिकृत वस्त्या हटवणे हे मोठे काम रेल्वेला करावे लागणार आहे. त्याचबरोबर येथे प्रस्तावित दिघा रेल्वे स्थानक येणार असल्याने या स्थानकासाठी जागा तयार करण्याचे आव्हानही रेल्वेसमोर आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड म्हणजेच शिवडी ते न्हावा शेवा यांदरम्यानच्या मोठय़ा रस्त्याचे काम आता लवकरच सुरू होणार आहे.  त्याशिवाय डोंबिवली-माणकोली-नाशिक महामार्ग या रस्त्याचे भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकतेच झाले आहे. या रस्त्याच्या कामाचा ताण काही प्रमाणात नाशिक महामार्गावरील वाहतुकीवर पडणार आहे.

वाहतूक कोंडी, रेल्वेच्या वेळापत्रकावर होणारा कामांचा परिणाम आदी गोष्टी विचारात घेऊनही ही कामे मुंबईकरांच्या फायद्याची आहेत. गेल्या अनेक वर्षांमध्ये मुंबईत सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता, पूर्व मुक्तमार्ग, सहार उन्नत मार्ग आणि मुंबई मेट्रो वन ही कामे वगळता मोठी कामे झालेली नाहीत. त्यामुळे मुंबईचा पायाभूत सुविधांच्या बाबतीतला अनुशेष भरून निघणे आवश्यक आहे. थोडा त्रास सहन करून तो भरून निघत असेल, तर ते केव्हाही भल्याचेच आहे.

 

सुरू असलेल्या प्रकल्पांची यादी

* डी. एन. नगर, अंधेरी-दहिसर पश्चिम मेट्रो

* अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो

* वडाळा-ठाणे-कासारवडवली मेट्रो

* कुलाबा-अंधेरी-सीप्झ मेट्रो

* दिवा-ठाणे पाचवी सहावी मार्गिका

* अंधेरी-गोरेगाव हार्बर मार्ग विस्तार

* कुर्ला-सीएसटी पाचवी-सहावी मार्गिका (परळ टर्मिनस)

* सीवूड-बेलापूर-उरण रेल्वेमार्ग

* बेलापूर-खारघर-तळोजा मेट्रो

सुरू होणाऱ्या प्रकल्पांची यादी

* विरार-डहाणू चौपदरीकरण रेल्वेमार्ग

* पनवेल-कर्जत दुपदरीकरण रेल्वेमार्ग

* कळवा-ऐरोली उन्नत रेल्वे जोडमार्ग

* मुंबई ट्रान्सहार्बर लिंक रोड

* घाटकोपर-कोपरखैरणे जोडरस्ता.

* डोंबिवली-माणकोली-नाशिक हायवे रस्ता

* ठाणे-बोरिवली रस्ता

* जल वाहतुकीसाठी जेट्टी बांधकाम

रोहन टिल्लू

@rohantillu