काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला अनुकूल वातावरण

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी नेत्यांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. पवारांच्या उपस्थितीमुळे राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीच्या प्रक्रियेला बळ मिळाले आहे.

सोनिया गांधी यांनी १०, जनपथ या नवी दिल्लीतील निवासस्थानी विरोधी नेत्यांकरिता मंगळवारी रात्री स्नेहभोजन आयोजित केले होते. या वेळी २० राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे या वेळी उपस्थित होते. समाजवादी पार्टी, बसपा, डाव्या पक्षांचे नेतेही उपस्थित होते. शरद पवार यांची उपस्थिती महत्त्वाची मानली जाते. कारण पुढील आठवडय़ात पवार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संयुक्तपणे नवी दिल्लीत विरोधी नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. काँग्रेसवर कुरघोडी करण्याकरिता या बैठकीचे आयोजन केल्याचे बोलले जाते. या पाश्र्वभूमीवर सोनियांच्या निवासस्थानी पवार हे उपस्थित राहिल्याने त्याला महत्त्व आहे. पवारांनी आयोजित केलेल्या बैठकीला सोनिया गांधी वा राहुल गांधी हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी व्हावी, असे दोन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. आघाडीसाठी राष्ट्रवादीने तयारी दर्शविली आहे. पण आघाडीचा निर्णय हा दिल्लीत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या पातळीवर होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जाहीर केले आहे. पवार आणि राहुल गांधी यांचे तेवढे सख्य नसले तरी पवार आणि सोनिया यांच्यात उत्तम समन्वय आहे. आघाडीच्या दृष्टीने सोनिया गांधी या राज्यात पुढाकार घेतील, असा राज्यातील काँग्रेस नेत्यांना विश्वास आहे. राष्ट्रवादीबद्दल राहुल गांधी यांच्या मनातील अढी लपून राहिलेली नाही. आघाडीकरिता सोनियांनीच पुढाकार घ्यावा, असा काँग्रेसमध्ये मतप्रवाह आहे. आघाडीच्या दृष्टीने सकारात्मक पावले पडत असली तरी दोन्ही काँग्रेसमध्ये जागावाटप हा संवेदनशील मुद्दा राहील. कारण निम्म्या जागांची मागणी राष्ट्रवादीकडून केली जाऊ शकते. त्याला काँग्रेस तयार होणे कठीण आहे.