मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला; साताऱ्याचे रणजितसिंह निंबाळकर भाजपमध्ये

देशात राजकीय हवा कुठल्या दिशेला आहे, याची जाणीव झाल्याने अपघात टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  ‘ यू टर्न ‘ घेतला, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा करुन पवार यांनी माघार घेतल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी पवार यांच्यावर टीका केली आणि देशात मोदीमय वातावरण असल्याचे स्पष्ट केले. पवार यांनी माढय़ातून लढूनच दाखवावे, त्यांना पराभूत करु, असे आव्हान सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिले.

माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शिक्षण मंत्री विनोद तावडे आदींच्या उपस्थितीत सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. स्वराज्य उद्योग समूह सांभाळणारे नाईक हे सातारा जिल्हा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष होते. त्यांना भाजपने माढय़ातून उमेदवारी जाहीर केली आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यानंतर भाजपने नाईक निंबाळकर या मातब्बर घराण्यातील नेत्याला भाजपमध्ये प्रवेश देऊन या मतदारसंघात भक्कमपणे तयारी केली आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह सर्वाचीच आम्हाला मदत आहे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी निंबाळकर आणि मोहितेपाटील यांच्या मागणीनुसार या जिल्ह्य़ातील कृष्णा खोऱ्यातील सिंचन प्रकल्प व कालव्यांची कामे तातडीने पूर्ण करण्यात येतील, असे स्पष्ट केले.

भाजप सरकार सत्तेवर आल्यावर आता विदर्भात सर्व निधी जाणार व पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय होणार, असा गैरसमज पसरविण्यात आला होता, याचा उल्लेख करुन फडणवीस म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या १५ वर्षांच्या कारकीर्दीत जेवढी सिंचनाची कामे पश्चिम महाराष्ट्रात झाली नाहीत, त्यापेक्षा अधिक निधी भाजप सरकारने पश्चिम महाराष्ट्राला सिंचन प्रकल्पांसाठी दिला आहे. सुमारे ६३ टक्के कामे ही निविदा रकमेपेक्षा कमी किंमतीत तर केवळ एक टक्का काम निविदा दरापेक्षा पाच टक्क्यांपर्यंत अधिक दराने झाले आहे. जनतेच्या तिजोरीतील ३००-३५० कोटी रुपये आम्ही वाचविले आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.

सहकारमंत्री देशमुख यांनी पवारांवर जोरदार टीका करुन राज्यातील सर्व ४८ जागांवर भाजपच जिंकेल, असा दावा केला. जात,पक्ष विचारुन मुख्यमंत्री फडणवीस कामे करीत नाहीत, त्यांनी दूध, साखर कारखानदार व शेतकरी यांना आणि सर्वच क्षेत्रांमध्ये चांगली मदत केली आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.