मुंबई : नागरिकत्व सुधारणा विधेयकाला लोकसभेत पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेने राज्यसभेत सभात्याग करून मतदानात सहभागी होण्याचे टाळले असले, तरी ही अप्रत्यक्षपणे सत्ताधारी भाजपला मदतच केल्याचा काँग्रेसचा आक्षेप आहे. विरोधात मतदान करणे राजकीयदृष्टय़ा शक्य नसल्यानेच सभात्याग करून शिवसेनेने स्वत:ची सुटका करून घेतली.

शिवसेनेने उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवर स्पष्टता आल्याशिवाय शिवसेना विधेयकाला पाठिंबा देणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. यामुळे शिवसेना राज्यसभेत विधेयकाला विरोध करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

शिवसेनेची मतपेढी आणि एकूणच भूमिका लक्षात घेता नागरिकत्व सुधारणा विधेयकावर विरोधी मतदान करणे राजकीयदृष्टय़ा अडचणीचे होते. आधीच भूमिका बदलल्याबद्दल भाजपने लक्ष्य केले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तर शिवसेनेला भूमिका बदलल्याबद्दल चिमटाही काढला.

लोकसभेत पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेने राज्यसभेतील मतदानाच्या वेळी सभात्याग करून अप्रत्यक्षपणे भाजपला मदतच केली. शिवसेनेने वास्तविक विरोधात मतदान करणे आवश्यक होते.

-नसीम खान, काँग्रेस नेते