जोगेश्वरी रेल्वे स्थानकाजवळ पूर्व-पश्चिमेला जोडण्यासाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलास नामदार जगन्नाथ ऊर्फ नाना शंकर शेट यांचे नाव देण्याची आग्रही मागणी भाजपकडून करण्यात येत होती. मात्र या पुलाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय परस्पर घेऊन शिवसेनेने भाजपवर कुरघोडी केली. सोमवारी पालिका सभागृहातही त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे.
जोगेश्वरी स्थानकाजवळील पुलाला नाना शंकर शेट यांचे नाव द्यावे, अशी मागणी करणारे पत्र भाजपच्या नगरसेविका उज्ज्वला मोडक यांनी चार महिन्यांपूर्वी प्रशासनाला दिले होते. पण गटनेत्यांच्या बैठकीत या पुलाला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्याचा प्रस्ताव शिवसेना नगरसेवक बाळ नर यांनी सादर केला. परिणामी, मोडक यांच्या पत्राकडे दुर्लक्ष करीत शिवसेना नेत्यांनी या पुलाला ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला.
नगरसेवकांना बजावला व्हिप
एवढेच नव्हे, तर त्याबाबतचा प्रस्ताव सोमवारी पालिका सभागृहात अंतिम मंजुरीसाठी सादरही केला. हे सगळे एवढय़ावरच थांबले नाही. तर या प्रस्तावाला भाजपतर्फे कडाडून विरोध केला जाईल हे लक्षात ठेवत शिवसेनेने व्हिप काढून नगरसेवकांना सभागृहात वेळेत हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्याच जोरावर भाजपच्या विरोधाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत या प्रस्तावाला सभागृहात मंजुरीही मिळवून शिवसेनेने अखेरच्या क्षणाला भाजपवर कुरघोडी केली.

भाजपला डिवचण्यासाठी..
वास्तविक भाजपला खूश करण्यासाठी जोगेश्वरी-गोरेगावदरम्यान ओशिवरा स्थानकाजवळ असलेल्या पुलाला शंकर शेट यांचे नाव देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला होता. पण सभागृहात केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव आणून शिवसेनेने भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला.