मुंबईतून तीन आणि राज्यातून १८ जागा जिंकल्याचा आनंद शिवसेना भवनात शुक्रवारी दुपारनंतर ओसंडून वाहत राहिला. विजयाचा जल्लोष साजरा करताना शिवसैनिकांच्या आनंदाला उधाण आले होते. या आनंदाच्या भरात शीख बांधवांनी सर्वाना खाऊ घातलेल्या ५०० किलोहून अधिक जिलब्यांमुळे या विजयाची गोडी आणखीच वाढली.
सेनेचे राहुल शेवाळे, अरविंद सावंत आणि गजानन कीर्तीकर हे तिन्ही उमेदवार आघाडीवर असल्याचे दुपारनंतर स्पष्ट झाले आणि सेनाभवनाचा परिसर गजबजू लागला. फटाक्यांचा माळा फुटत आहेत आणि शिवसैनिक संदलच्या तालावर नाचत आहेत, हे दृश्य त्यानंतर रात्रीपर्यंत कायम होते. सायंकाळी पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे कुटुंबीय येथे येऊन पोहचल्यानंतर विजयोत्सवाला जणू उधाण आले. फटाक्यांचे आवाज कानठळ्या बसवू लागले आणि नाचणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्याही वाढली.हा विजयाचा प्रसंग गोड करण्यासाठी सेनेचे समर्थक असलेल्या मुंबईतील शीख बांधवांनी सेनाभवनात येणाऱ्या प्रत्येकाला गरमागरम जिलब्या यथेच्छ खाऊ घातल्या. या जिलब्या येथून जवळच तयार केल्या जात होत्या. ५०० किलो जिलब्यांचे वाटप करण्याचे संबंधितांनी ठरवले होते. मात्र त्यापेक्षा जास्त जिलब्या खाऊ घालाव्या लागल्या तरी त्याला आमची तयारी असल्याचे या लोकांनी सांगितले.दादरमधील गुरुद्वारा सिंग सभा दरबारातर्फे गेल्या १४ एप्रिल रोजी बैसाखीनिमित्त झालेल्या ‘लंगर’साठी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आले होते. त्यावेळी तेथे खाऊ घालण्यात आलेली जिलबी त्यांना खूप आवडली. ‘तुम्ही आमचेच आहात आणि त्यामुळे आम्ही तुमच्या सोबत राहू’, असे उद्गार त्यांनी काढले. तेव्हा, लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपचे उमेदवार बहुसंख्येने निवडून आले, तर येणारे लोक जेवढी खातील तेवढी जिलबी आम्ही सर्वाना खाऊ घालू, असे सभेचे प्रमुख कुलवंतसिंग यांनी त्यांना सांगितले होते. गुरु तेगबहादूर नगरच्या गुरुद्वारा दशमेश दरबारानेही याला पाठिंबा दिला.  शुक्रवारी त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी मुंबईतील सेना समर्थक शीख बांधवांनी जिलब्या देऊन सर्वाचे तोंड गोड केले.

अफवांचे पीक
उत्तर मुंबईतील भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी दीड लाख मतांनी आघाडीवर असताना त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार संजय निरूपम पाच हजार मतांनी निवडून आल्याचे वृत्त पसरले. गोपाळ शेट्टी या मतदारसंघातून पहिल्यापासून आघाडीवर होते. पण, हे वृत्त पसरविणाऱ्यांनी थेट मंत्रालयातून निरूपम जिंकल्याचा संदर्भ जोडल्याने सर्व गोंधळून गेले. पत्रकारांनी तात्काळ मतमोजणी केंद्रात जाऊन खातरजमा केली. अर्थातच तोपर्यंत गोपाळ शेट्टी यांची आघाडी दोन लाखांवर गेली होती.

त्सुनामी आली
प्रत्येक उमेदवाराने आपल्या एका कार्यकर्त्यांला मतदानाच्या आकडय़ांची नोंद ठेवण्यासाठी मतमोजणी केंद्रावर नेमले होते. उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसतर्फे एक महिला याची नोंद ठेवत होत्या. सर्व फेऱ्या पार पाडल्यानंतर ही महिला नोंद केलेल्या कागदांचे भेंडोळे घेऊन जाण्यास निघाल्या. कुणीतरी त्यांना हटकले. काही चान्स आहे का मॅडम, म्हणून गंमतीने विचारणा केली. त्यावर त्यांची उत्सुर्त प्रतिक्रिया होती.. ‘कसला चान्स? ही तर त्सुनामी आहे, त्सुनामी.’

लिंबू-टिंबू पण आले
उत्तर मुंबईची मतमोजणी सुरू असताना भाजपचे काही कार्यकर्ते मीडिया सेंटरमध्ये येऊन बसले होते. गोपाळ शेट्टी यांच्या विजयाने ते आनंदून गेले होते. हमारे साब तो पहलेसेही आगे थे, अशा शब्दांत ते आपला आनंद व्यक्त करीत होते. एका पत्रकाराने त्यांना शेजारच्या मतमोजणी केंद्रावर भाजपच्या पूनम महाजनदेखील पहिल्यापासून आघाडीवर असल्याचे लक्षात आणून दिले. त्यावर या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया पुरेशी बोलकी होती. कुजबुजत्या स्वरात ते म्हणाले, ‘यह (उत्तर-मध्य) सीट तो हारनेवाले कॅण्डीडेट को दी जाती है. मोदीजी का इतना प्रभाव था के छोटे-बडे सब आये.’