X
X

मातोश्रीची नाराजी नको म्हणून सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर रावसाहेब दानवेंना पाठवले माघारी

READ IN APP

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बैठकीपासून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना दूर ठेवण्यात आले आहे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बैठकीपासून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना दूर ठेवण्यात आले आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी तक्रार केल्यामुळे रावसाहेब दानवे यांना मातोश्रीवरील बैठकीत सहभागी होता आले नाही असे वृत्त एबीपी माझा वाहिनीने दिले आहे.

मातोश्रीवरील बैठकीत रावसाहेब दानवेंना स्थान देऊ नका असे शिवसेना नेतृत्वाला सांगण्यात आले होते. म्हणून रावसाहेब दानवे सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर माघारी फिरले. जालना जिल्ह्यातील राजकारणामुळे रावसाहेब दानवेंना बैठकीपासून दूर ठेवले असे बोलले जात आहे.

दरम्यान रावसाहेब दानवेंनी स्वत: खुलासा करताना हे वृत्त खोडसाळपणाचे असल्याचे म्हटले आहे. मी मातोश्रीवर जाणारच नव्हता. तसा कुठलाही नियोजित कार्यक्रम नव्हता. त्यामुळे मला दूर ठेवण्याचा प्रश्नच नाही अशी सारवासारव दानवेंनी केली. मी माधुरी दिक्षित, रतन टाटा यांच्या निवासस्थानी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत होतो. पण मातोश्रीवर जाण्याबद्दल काहीच ठरले नव्हते असे त्यांनी सांगितले.

पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. मागच्या चारवर्षांपासून शिवसेना-भाजपा युतीमध्ये निर्माण झालेली कटुता संपवण्यात अमित शहांना यश येणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण भाजपाकडून मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीला कंटाळून शिवसेनेने एकला चलो रे चा नारा दिला आहे.

भविष्यात सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा शिवसेनेने आधीच केली आहे. शिवसेना आता माघार घेऊन भाजपाशी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी करणार का ? मातोश्रीवरुन आज युतीसाठी सकारात्मक संदेश जाणार का ? याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.

21
X