News Flash

५६ इंची छातीचा दावा करणारे, कमर बाजवांचा बाजा वाजवणार का?-शिवसेना

बाजवांचा बाजा वाजवण्याचे काम ५६ इंची छातीचा दावा करणारे करतील का? असा प्रश्न उपस्थित उपस्थित करत शिवसेनेने पंतप्रधान मोदींवर टीका केली

सीमेवर जे रक्त सांडले आहे आणि सांडते आहे त्याचा पुरेपूर बदला पाकिस्तान घेईल असे वक्तव्य पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांनी केले. याच वक्तव्याचा आधार घेत शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पाकिस्तान सरकारमधील नव्याचे नऊ दिवस संपले आहेत. भारताने एक पाऊल पुढे टाकले तर पाकिस्तान दोन पावले पुढे टाकेल असा तोंडदेखला बुडबुडा इम्रान खान यांनी सोडला होता. मात्र पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांनी हा बुडबुडा हवेतच फोडला आहे. या बाजवांचा बाजा वाजवण्याचे काम ५६ इंची छातीचा दावा करणारे करतील का? असा प्रश्न उपस्थित करत मोदी सरकारवर शिवसेनेने टीका केली आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात?
पाकिस्तानातील नव्या सरकारचे ‘नऊ दिवस’ बहुधा संपत आले आहेत. त्या देशाचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान हे कट्टर हिंदुस्थानद्वेष्टे म्हणून परिचित असले तरी अलीकडेच त्यांनी ‘हिंदुस्थानने एक पाऊल पुढे टाकले तर पाकिस्तान दोन पावले पुढे टाकेल’ असा बुडबुडा तोंडदेखला का होईना, पण सोडला होता. मात्र आता पाकिस्तानी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी हा बुडबुडा हवेतच फोडला आहे. हिंदुस्थानविरुद्ध नेहमीप्रमाणे गरळ ओकले आहे. ‘सीमेवर जे रक्त सांडले आहे आणि सांडत आहे त्याचा पुरेपूर बदला पाकिस्तान घेईल’, अशी दर्पोक्ती बाजवा यांनी केली आहे. तेवढय़ावरच त्यांची वळवळ थांबलेली नाही. कश्मीरमधील जनतेला आपला ‘सलाम’ असून कश्मिरी जनता खंबीरपणे हिंदुस्थानविरुद्ध लढा देत आहे याचा आपल्याला अभिमान वाटतो, असेही ‘चाँदतारे’ या महाशयांनी तोडले आहेत.

इम्रान खान यांनी उडविलेल्या शांततेच्या कबुतराची ‘शिकार’ त्यांनी केली आणि त्याचवेळी विकास नव्हे, तर हिंदुस्थानद्वेष हाच पाकिस्तानचा मूलमंत्र राहणार हे पुन्हा दाखवले. पाकिस्तानची 30 कोटींची आर्थिक रसद दोन दिवसांपूर्वीच तोडणाऱ्या अमेरिकेलाही डिवचले आणि हिंदुस्थानलाही आव्हान दिले.  पाक पंतप्रधानांनी चर्चा आणि शांततेची भाषा करायची आणि त्यांच्या लष्करप्रमुखांनी युद्धखोरीची खुमखुमी दाखवायची हा पाकिस्तानचा जुना खेळ आहे. इम्रान खान आणि बाजवा आता तेच करीत आहेत.

पाकिस्तान तिकडून गोळीबार करतो, आपण इकडून शब्दांचे फुसके बार उडवतो. पाकिस्तान दहशतवादी हल्ले घडवून आणतो आपण फक्त इशारे-नगारे वाजवतो. पाकिस्तानचा इतिहासच नव्हे, तर भूगोलही बदलण्याचा निर्धार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पाकडे लष्करशहा आणि राज्यकर्ते हिंदुस्थानचा बदला घेण्याच्या जाहीर धमक्या देतच राहणार. पाकिस्तानचे विद्यमान लष्करप्रमुख कमर बाजवा तेच करीत आहेत. त्यांचा ‘बाजा’ वाजवा. 56 इंची निधडय़ा छातीचा दावा करणारे तो वाजवणार का?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 6:00 am

Web Title: shivsena criticized pm narendra modi on qamar bajwas statement on india saamna editorial
Next Stories
1 मुदतपूर्व निवडणुकांचा निर्णय काही वेळा अंगलट !
2 उसावर संकट
3 कोकणात भाजपचा भरवसा आयारामांवर!
Just Now!
X