सुशांत सिंह मुंबईचा मुलगा आहे. कोणी कितीही दावा केला तरी तो मुंबईचा आहे. त्याला न्याय देण्याची आमची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. मुंबई पोलीस आणि सरकारचं ते दायित्व आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी सत्य समोर आलं पाहिजे असं मलाही वाटत असल्याचं सांगितलं आहे.

संजय राऊत यांनी सांगितलं की, “ईडी चौकशी करत आहे तर करु देत. कायदा आम्हालाही माहिती आहे. कायदा तयार होतो तेव्हा आम्हीही संसदेत असतो. कायदा कसा मोडला जातो हेदेखील आम्ही पाहिलं आहे. ज्यांना जो तपास करायचा आहे तो करु देत. सत्य समोर आलं पाहिजे असं मलाही वाटतं”. पुढे ते म्हणाले की, “जर तपासात चूक होत असेल तर सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे. पण काही लोक राजकारण करत आहेत. बिहारमधील राजकारणासाठी तुम्ही बिहार पोलिसांकडे तपास देता आणि ते मुंबईत येतात हे चुकीचं आहे”.

“हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंचं नाव…,” सुशांत सिंह प्रकरणी संजय राऊत यांचं खुलं आव्हान

सुंशात सिंह प्रकरणाचा आदित्य ठाकरेंशी संबंध जोडण्यावरुन टीका करताना संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंचा या सर्व प्रकरणाशी काय संबंध? हिंमत असेल तर भाजपाच्या लोकांना जाहीरपणे त्यांचं नाव घ्यावं असं आव्हानच दिलं. “ते चांगलं काम करत आहेत, मदत करत आहेत. बदनामी करण्याची मोहीम सुरु असून हे चांगलं राजकारण नाही,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“एका उभरत्या नेतृत्त्वाचं खच्चीकरण करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर काय फायदा होणार आहे. हे राज्याचंच नुकसान आहे. कोणत्याही पक्षातील युवा नेत्यांचं खच्चीकरण केलं जाऊ नये,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.