शिवसेनेच्या वतीने अजान पठण स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आलं आहे. मुस्लीम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी यासाठी ही स्पर्धा घेण्यात येणार असल्याचं पांडुरंग सकपाळ यांनी एका बसीरत ऑनलाइनशी बोलताना सांगितलं आहे. यावेळी त्यांनी अजानला विरोध करणंही चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यावरुन भाजपाने शिवसेनेवर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पांडुरंग सकपाळ यांनी म्हटलं आहे की, “अजान एका धर्माची भावना आहे. अजानमध्ये खूप गोडवा आहे, त्यामुळे मनःशांती मिळते. मी बडा कब्रस्तानच्या शेजारी राहतो. त्यामुळे माझ्या कानावर रोजच अजान पडते. पाच मिनिटाच्या अजानमुळे कुणाला त्रास होत असेल तर ही गोष्ट मिठाच्या खड्यासारखी समजून त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे”.

“अजान देणाऱ्या मुलांचे उच्चार, त्यांचा आवाज आणि पाठांतर पाहून त्यांना बक्षिस दिलं जाईल. यासाठी मौलाना परीक्षकाचे काम पाहतील. स्पर्धेचा सर्व खर्च शिवसेना करणार आहे,” अशी माहिती पांडुरंग सकपाळ यांनी दिली आहे. “महाआरतीप्रमाणेच अजानचं महत्त्व आहे. प्रेम आणि शांतीचं ते प्रतिक आहे. त्यावर वाद घालणं उचित वाटत नाही,” असंही ते म्हणाले आहेत.

आणखी वाचा- ‘बाळासाहेब प्रत्येक धर्म प्यारा बोलले असतील पण’…अजान स्पर्धेवरुन प्रविण दरेकरांचा शिवसेनेवर हल्लाबोल

प्रवीण दरेकरांची टीका
“पांडुरंग सकपाळ यांचे विधान आश्चर्यकारक आहेच, परंतु शिवसेनेचं बदलतं स्वरूप सत्तेननंतर दिसत आहे. त्यांनी आणखी कहर म्हणजे बाळासाहेबांचा दाखला दिला आहे, बाळासाहेब प्रत्येक धर्म प्यारा बोलले असतील परंतु त्यांची पालखी उचलणे कधी बोलले नाही तर त्यांची टीका त्यांच्या आचार विचारावर त्यांनी केलेली आहे सत्तेच्या नादात मानवतेचा उल्लेख करून हिंदुत्वाची भूमिका सरमिसळ झाल्याचे पांडुरंग सकपाळ यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते,” अशी टीका भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

“मातोश्रीत नमाज पढल्याचा उल्लेख हे मोठं विधान आहे. पांडुरंग सकपाळ हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत आणि म्हणून संजय राऊत यांनी सत्ता टिकवण्यासाठी आज शिवसेनेच्या मूळ आचार विचाराला नेतृत्वाला तिलंजला देणारी वाटचाल येथे सुरु आहे ह्याच हे द्योतक आहे .बाळासाहेब ठाकरे यांनी नमाजासंदर्भात भोंगेवरुन त्यांनी घेतलेली भूमिका व त्यांनी केलेली कडवट टीका देशवासियांनी पाहिलेली आहे. शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्वाचा व देशप्रेमाचा विसर सातत्याने शिवसेनेला महाविकास आघाडीमध्ये आल्यानंतर पडत चालल्याचे चित्र आहे,” असंही ते म्हणाले आहेत.

“मंदिरांत घंटा बडवणारा नव्हे तर अजान स्पर्धेचं आयोजन करणारा हिंदू हवा”
“शिवसेनेला आता मंदिरांत घंटा बडवणारा हिंदू नकोय तर अजान स्पर्धेचं आयोजन करणारा हिंदू हवा आहे. शिवसेना नेत्यांना वेदाच्या शांतीपाठातून मनःशांती मिळत नाही, ज्ञानोबा-तुकोबांच्या अभंगातून, भजन किर्तनातून मनःशांती मिळत नाही तर अजान ऐकण्यातून मिळते. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की हिंदुत्व हे काय धोतर आहे का सोडून द्यायला ? पण उद्धवजी धोतर तरी कमरेभोवती घट्ट आवळलेलं असतं पण तुमचं हिंदुत्व हे खांद्यावरच्या उपरण्यासारखं होतं, जे तुम्ही एक वर्षापूर्वीच काढून बाजूला ठेऊन दिलं. इतकं तकलादू हिंदुत्व शिवसेनेचं होतं हे आता महाराष्ट्रासमोर सिद्ध झालंय,” अशी टीका भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या आचार्य तुषार भोसलेंनी केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena pandurang sakpal to organise azan competition sgy
First published on: 30-11-2020 at 15:57 IST