मित्राला मारहाण का केली याचा जाब विचारायला गेलेल्या एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. शनिवारी दुपारी करी रोडच्या गोदरेज मैदानात ही घटना घडली. अमित लोके (२२) हा तरुण आपल्या दोन मित्रांसह करी रोडच्या गोदरेज मैदानात गप्पा मारत बसला होता. त्याच ठिकाणी असलेल्या अंकीत नाईक याच्याशी त्यांचा वाद झाला. आमच्याकडे रागाने का बघतोय असे अमितने विचारल्यानंतर अंकीतने अमितच्या कानाखाली मारली. ही बाब अमितने आपले दोन मित्र प्रितम सोनार (१८) आणि हर्षल दळवी (३०) यांना सांगितली. मित्राला झालेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी हे दोघे घटनास्थळी आले. त्यावेळी आरोपी अंकीतने या दोघांवर धारदार हत्याराने वार केली. जखमी अवस्थेत दोघांना केईएम रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्रितमचा मृत्यू झाला तर हर्षलवर उपचार सुरू आहेत. काळाचौकी पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

दोन बोटींच्या धडकेत एक ठार
मुंबई : दोन प्रवासी बोटींची धडक होऊन झालेल्या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला. विजय मनवर (२६) असे या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी सकाळी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर ही घटना घडली.  विजय मनवर हा आपल्या पत्नीसह मढ जेट्टीहून वर्सोवा येथे निघाला होता. धर्मा नावाच्या बोटीतून ते निघाले होते. सकाळी ९ च्या सुमारास वर्सोवा जट्टी पासून ४० किलोमीटर अंतरावर धर्मा बोट द्वारका नावाच्या प्रवासी बोटीला धडकली. या अपघातात विजय मनवर याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्याला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला. वर्सोवा पोलिसांनी या अपघाताप्रकरणी द्वारका आणि धर्मा बोटींच्या चालकावर निष्काळजीपणे बोट चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला
मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या एका ३० वर्षीय महिलेचा मृतदेह विक्रोळीच्या सुर्यानगर येथील एका खोलीत आढळून आला. विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. विक्रोळी पश्चिमेच्या इस्लामपुरा भागीतील नूरानी मशिदीलगतच्या  खोली क्रमांक ११ चा भाडेकरू दोन महिन्यांपासून खोली बंद करून निघून गेला होता. त्यामुळे त्याचे मासिक भाडेही मिळत नव्हते. शनिवारी त्या खोलीचे दार उघडले असता त्या खोलीत विभा उर्फ अर्चना ठाकूर (३०) या महिलेचा मृतदेह आढळून आला. सुऱ्याने वार करून तिची हत्या करण्यात आली होती. विभा ही विवाहित होती. परंतु पती बरोबर पटत नसल्याने ती माहेरी आली होती. गेल्या काही दिवसांपासून ती बेपत्ता होती अशी माहिती विक्रोळी पार्कसाईट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सकपाळ यांनी दिली.

चुनाभट्टी येथे लहानग्याचे अपहरण
मुंबई : चुनाभट्टीत राहणाऱ्या भूषण सावंत या आठ वर्षीय मुलाचे शनिवारी अज्ञात इसमाने पळवून नेले आहे. भूषण हा चुनाभट्टीच्या महादेव भुवन परिसरातील राणे चाळीत रहात होता. शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास तो जवळच्या नातेवाईंकांकडे गेला होता. तेथून तो घरी परतला नाही. त्याचा शोध सुरू असता एका अनोळखी इसमाने त्याला पळवून नेल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्या मुलाचा शोध सुरू आहे.

ठाण्यात वायुगळती
ठाणे : येथील लुईसवाडी भागात आनंद सावली इमारतीजवळ रविवारी सायंकाळी महानगर गॅसची पाइपलाइन फुटून गॅसगळती होऊ लागल्याने सुमारे ६० ते ७० इमारतीचा गॅसपुरवठा एक ते दीड तास खंडित करण्यात आला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली. यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या घटनेनंतर तातडीने पाइपलाइन दुरुस्तीचे काम हाती घेतले.ड्रेनेजचे काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून ही घटना घडल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात येत असले तरी त्याचा तपास पथकामार्फत सुरू आहे, असे महानगर गॅस कंपनीने स्पष्ट केले.

प्रवाशाचा रिक्षासह पोबारा
ठाणे  : प्रवासी म्हणून रिक्षेत बसलेल्या एका प्रवाशाने रिक्षाच पळवून नेल्याची घटना पारसिक रेतीबंदर ते टोलनाकादरम्यान शुक्रवारी घडली आहे. चरई भागातील चंदनवाडी येथे राहणारे देवमणी यादव हे रिक्षाचालक पारसिक ते टोलनाकादरम्यान प्रवास करीत होते. या वेळी एक प्रवासी त्यांच्या रिक्षेत बसला. प्रवाशाने लघुशंका आल्याचे सांगून रिक्षा एके ठिकाणी थांबवली. हे पाहून रिक्षाचालकही लघुशंका करण्यासाठी गेला. प्रवाशाने झटपट रिक्षेत बसून रिक्षा घेऊन पलायन केले. कळवा पोलीस ठाण्यात अनोळखी प्रवाशाविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबरनाथमध्ये लाचखोर पोलिस अटकेत
ठाणे  : अंबरनाथ पोलीस ठाण्यातील पोलीस दिलीप साहेबराव राजपूत (४३) यांना तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. यापूर्वी दिलीप राजपूतने तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारली होती. उर्वरित पाच हजार रुपये देत नाही म्हणून दिलीपने तक्रारदाराच्या मागे तगादा लावला होता. तक्रारदाराने मोडकळीस आलेल्या घराचे बांधकाम सुरू केले होते, ज्यास  विकासकाने हरकत घेतली होती. त्यावर तक्रारदाराने विकासकाविरुद्ध तक्रार केली होती. आपल्याच जागेत बांधकाम सुरू ठेवण्यासाठी राजपूत यांनी तक्रारदाराकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी केली.

रिक्षेच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
ठाणे : अंबरनाथ एमआयडीसी येथे एका रिक्षाचालकाने दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत जबर जखमी झालेल्या तरुणाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी पहाटे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघातानंतर रिक्षाचालक पळून गेला आहे. या अनोळखी रिक्षाचालकाविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  संतोष जवाहरलाल जैस्वाल हा मुलगा मंगळवारी आनंदनगर एमआयडीसी येथून दुचाकीवरून वैभव हॉटेलकडे येत होता. या वेळी एका रिक्षाचालकाने संतोषच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

फरार आरोपी पोलिसांच्या जाळयात
नवी मुंबई : तुभ्रे येथील एका खून प्रकरणात कोल्हापूर येथील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी संचित रजेच्या बहाण्याने दोन वर्षे फरार होता. त्याला पकडण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. फरार आरोपी राहुल रंगनाथ दांडगे हा मे २०१२ मध्ये २८ दिवसांच्या संचित रजेवर कोल्हापूर येथील कारागृहातून सुटला पंरतु पुन्हा हजर झाला नसल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला गेला. मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळ्यास १४ जून रोजी पोलिसांनी आरोपीला अटक केले. नवी मुंबई पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्रीकांत पाठक, सहा. आयुक्त रणजित धुरे यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.

कल्याणमध्ये गृहसंकुलाची भिंत कोसळली
कल्याण  : खडकपाडा भागातील टेकडीवर उभारण्यात आलेल्या एका गृहसंकुलाची संरक्षक भिंत दुसऱ्या गृहसंकुलाच्या आवारातील बगिचामध्ये रविवारी दुपारी कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली. दुपारची वेळ असल्याने या भागात वर्दळ नव्हती, त्यामुळे जीवित हानी झाली नाही.  गोदरेज हिल भागातील क्यासारिनो-अक्वारिनो गृहसंकुलांच्या आवारात मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू आहे. ही गृहसंकुले टेकडय़ांवर उभारण्यात येत आहेत. रविवारी दुपारी मातीचा भराव व त्यालगत बांधलेली संरक्षक भिंत शिव व्हॅली व मलबारी मेडोज या गृहसंकुलांच्या आवारात असलेल्या बगिचामध्ये कोसळली.