मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर १६० अनधिकृत प्रवेशद्वारे; सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर

मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानक हद्दीत असणारी अनधिकृत प्रवेशद्वारे सध्या रेल्वेसाठी डोकेदुखी बनली आहे. मध्य व पश्चिम रेल्वेवर एकूण १६० अनधिकृत प्रवेशद्वारे असून त्यामुळे रेल्वे व प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दाच उपस्थित झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अनधिकृत प्रवेशद्वारांची संख्या जरी कमी झाली असली तरी ती पूर्णपणे बंद करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलेले नाही. महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी प्रवासी या प्रवेशद्वारांचा शॉर्टकट म्हणून वापर करत जीव धोक्यात घालत आहेत.

मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकात असणाऱ्या अनधिकृत प्रवेशद्वारांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतोच. संरक्षक िभत तोडणे, तारांचे कुंपण कापणे इत्यादी प्रकार करतानाच अनेक नवीन अनधिकृत प्रवेश तयार केले जातात. बहुतांश प्रवेशद्वारे रुळाजवळच असणाऱ्या झोपड्डपट्टीधारकांकडून तसेच फेरीवाल्यांकडून तयार करण्यात येत असल्याचे लोहमार्ग पोलीस सांगतात. या प्रवेशद्वारांतून रुळांवर गर्दुल्ले आणि भिकारी प्रवेश करतात. त्याशिवाय प्रवाशांकडून शॉर्टकटचा मार्गही अवलंबला जातो.

लोहमार्ग पोलिसांकडून या प्रवेशद्वाराची वेळोवेळी माहिती रेल्वे प्रशासनाला दिली जाते, तरीही रेल्वेला अनधिकृत प्रवेशद्वारे कायमस्वरूपी बंद करण्यात अपयशच आले आहे.

वाशी लोहमार्ग पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गोवंडी, मानखुर्द, वाशी, सानपाडा, जुईनगर, सीवूड दारावे, तुभ्रे, कोपरखैरणे, घणसोली स्थानक परिसरात एकूण २५ अनधिकृत प्रवेशद्वारे आहेत. त्यानंतर कुर्ला पोलीस ठाणे अंतर्गत कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, नाहूर, मुलुंड या स्थानक परिसरात २१ प्रवेशद्वारे अनधिकृत असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांकडून देण्यात आली. त्यापाठोपाठ ठाणे व कल्याण विभागाचाही क्रमांक लागतो. पश्चिम रेल्वेवरील वसई रोड पोलीस स्थानकांतर्गतही येणाऱ्या वसई, नालासोपारा, विरारमध्ये १३ आणि विलेपाल्रे, अंधेरी, जोगेश्वरी या अंधेरी लोहमार्ग पोलीस स्थानक हद्दीत १० अनधिकृत प्रवेशद्वारे आहेत. गेल्या वर्षी उपनगरी रेल्वेमार्गावर २६७ अनधिकृत प्रवेशद्वारे होती. ही बाब लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देताच त्यावर कार्यवाही करण्यात आली. मात्र पूर्णपणे ते बंद करण्यात न आल्याने सध्या १६० अनधिकृत प्रवेशद्वारे आहेत.

अनधिकृत प्रवेशद्वारांची माहिती

  • सीएसएमटी पोलीस ठाणे (मस्जिद, सॅण्डहर्स्ट रोड, भायखळा)- १३ प्रवेशद्वारे
  • दादर पोलीस ठाणे (करी रोड, दादर, शीव) – ६ प्रवेशद्वारे
  • ठाणे पोलीस (ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, दातिवली, तळोजा, कळंबोली, निळजे, ऐरोली) – १९ प्रवेशद्वारे
  • डोंबिवली पोलीस ठाणे (डोंबिवली) – १
  • कल्याण पोलीस ठाणे (कल्याण, शहाड, आंबिवली, टिटवाळा, वािशद, आसनगाव, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर) – १९ प्रवेशद्वारे
  • कर्जत पोलीस ठाणे (वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी, खोपोली) – ११ प्रवेशद्वारे
  • पनवेल पोलीस ठाणे (बेलापूर, खारघर, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल) – ८ प्रवेशद्वारे
  • मुंबई सेंट्रल पोलीस ठाणे (दादर, माटुंगा) – २ प्रवेशद्वारे
  • वांद्रे पोलीस ठाणे (वांद्रे टर्मिनस, वांद्रे लोकल, खार रोड) – ८ प्रवेशद्वारे
  • बोरिवली पोलीस ठाणे (गोरेगाव)- १ प्रवेशद्वार
  • पालघर पोलीस ठाणे (सफाळे, पालघर, बोईसर)- ३ प्रवेशद्वारे

कमी मनुष्यबळ

रेल्वे स्थानकातील अधिकृत प्रवेशद्वारावरही असलेल्या कमी मनुष्यबळामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे अधिकृत प्रवेशद्वारांवर अतिरिक्त रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तनात करण्याची मागणीही लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे सुरक्षा दलाकडे याआधीच केली आहे.