स्थलांतरित मजुरांना गावी पोहोचवण्यासाठी बस, ट्रेनची व्यवस्था करणाऱ्या अभिनेता सोनू सूदला सोमवारी पोलिसांनी रोखलं. आरपीएफकडून त्याला वांद्रे टर्मिनलला जाण्यापासून रोखण्यात आलं. स्थलांतरितांसाठी बस किंवा ट्रेनची व्यवस्था केल्यानंतर सोनू सूद स्वत: जाऊन त्यांची भेट घेत होता. पण सोमवारी पहिल्यांदाच त्याला जाण्यापासून रोखण्यात आलं.

उत्तर प्रदेशला जाणाऱ्या मजुरांची भेट घेण्यासाठी सोनू सूद वांद्रे टर्मिनलला पोहोचला होता. मात्र पोलिसांनी रोखल्यामुळे त्याला बाहेरूनच स्थलांतरितांना निरोप द्यावा लागला. सोनू सूदच्या मदतीवरून सध्या चांगलंच राजकारण रंगलं आहे. भाजपा-शिवसेना हे दोन्ही पक्ष सोनू सूदच्या मदतीवरून एकमेकांसमोर आले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’तील लेखात सोनूवर टीका केल्यानंतर रविवारी सोनू सूदने ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेटसुद्धा घेतली होती.

आणखी वाचा- संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता सोनू सूद म्हणतो…

‘स्थलांतरीत मजूर आणि माझं नातं खूप वर्षांपासूनचं आहे. स्थलांतरीत मजुरांसाठी केलेलं कार्य फक्त एका राज्यापुरतं मर्यादित नाही. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ज्याने मला मदतीसाठी बोलावले त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला. प्रत्येक राज्याच्या सरकारने माझ्या या कामात सहकार्य केलं,’ असं मराठीत ट्विट करत सोनू सूदने त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या.