ज्या भागात करोनाचे रुग्ण आढळले नाहीत, अशा भागांतील शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षां गायकवाड यांच्याकडे केली आहे. त्यांनी बुधवारी शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन त्यासंबंधीचे निवेदन दिले.

राज्यातील सरसकट शाळा सुरू न करता, ज्या भागात एका महिन्यात एकही करोनाचा रुग्ण आढळला नाही, त्या भागातील शाळा पूर्ण प्रतिबंधात्मक उपाययोजना करून व खबरदारी घेऊन सुरू करण्याचे नियोजन होते. १६ जून रोजी तसा शासन आदेशही काढण्यात आला होता. जिथे करोनाचा रुग्ण नाही तेथे शाळा सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी द्यावी आणि शालेय व्यवस्थापन समितीने त्याबाबत निर्णय घ्यावा, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्य़ांतील जवळपास दोनशे ते अडीचशे शाळा सुरू झाल्या होत्या, परंतु उच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिल्यामुळे शाळा बंद कराव्या लागल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुंबईत बुधवारी मेधा पाटकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यांची भेट घेऊन नर्मदेच्या पट्टय़ातील आदिवासी भागातील शाळांच्या संदर्भात, विशेषत: ऑनलाइन शिक्षण, माध्यान्ह भोजन या समस्यांबाबत त्यांना निवेदन दिले. ज्या भागात करोना रुग्ण नाहीत, अशा भागांतील शाळा सुरू करायला काही हरकत नाही, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.

नंदुरबार जिल्ह्य़ात शाळा सुरू करण्यासारखी परिस्थिती आहे. फार मोठय़ा प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव तिकडे नाही. धडगाव तालुक्यात फक्त एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे जिथे करोना नाही, तिथे शाळा सुरू कराव्यात, या मागणीवर बैठक घेऊन चर्चा करू, असे आश्वासन वर्षां गायकवाड यांनी दिल्याचे मेधा पाटकर यांनी सांगितले.