करोनाच्या संसर्गामुळे गेल्या आठ महिन्यांपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद असलेला उपनगरीय रेल्वे प्रवास सुरू करण्यास अखेर राज्य सरकार तयार झाले. महानगर प्रदेशातील लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असलेली उपनगरीय रेल्वे दिवाळीपूर्वी सुरू करण्याची हालचाल मंत्रालयात सुरू झाली आहे. त्याबाबत राज्य सरकारने बुधवारी रेल्वेकडे विचारणा केली असून आता रेल्वेच्या निर्णयावर त्याची तारीख निश्चिती होईल.

करोनाचा देशभरातील वाढता संसर्ग लक्षात घेऊन २२ मार्चपासून मुंबई तसेच पुणे उपनगरीय रेल्वेसेवा बंद करण्यात आली. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कसारा-कर्जत- खोपोली- पनवेल दरम्यान तसेच ठाणे-वाशी आणि नेरूळ ते खारकोपर या मार्गावर मध्य रेल्वेच्या दररोज १७७४ फेऱ्या होतात. पश्चिम रेल्वेवरही चर्चगेट ते विरार-डहाणू दरम्यान १२७८ लोकल फेऱ्या होतात. यातून ७० लाखांहून अधिक नोकरदारवर्ग ये-जा करतो. महानगर प्रदेशातील करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन बंद ठेवण्यात आलेली उपनगरीय रेल्वेसेवा १५ जूनपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली. सुरुवातीस मंत्रालय, विधानभवन, सर्व महापालिका, आरोग्य सेवा, शासकीय आणि खासगी रुग्णालयातील कर्मचारी आणि पोलिसांना प्रवासाची मुभा देण्यात आली. त्यानंतर मुंबई आणि महानगर प्रदेशातील करोना नियंत्रणात येत असल्याने टप्प्याटप्प्याने केंद्रीय कर्मचारी, बँक कर्मचारी आणि अन्य महत्त्वाच्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी काही अटींच्या माध्यमातून उपनगरीय रेल्वेतून प्रवासाची परवानगी देण्यात आली.

रेल्वेचे म्हणणे..

उपनगरीय रेल्वे सर्वासाठी सुरू करण्याबाबत रेल्वेच्या सज्जतेची माहिती सरकारला दिली जाणार असून लोकल फेऱ्या, करोनाकाळात प्रवासासाठी असलेले नियम याबाबत राज्य सरकारशी चर्चा के ली जाणार असल्याचे रेल्वेकडून ट्विटरवरुन स्पष्ट करण्यात आले.

अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी देताना एका लोकलमधून ७०० प्रवाशांना प्रवासाची मुभा, असा नियम आहे. पश्चिम रेल्वेवर दर दिवशी १,३०० लोकल फे ऱ्या होतात. त्यामुळे साधारण ९ ते १० लाख प्रवासी आणि मध्य रेल्वेवर दिवसाला १,७०० पर्यंत फे ऱ्या याप्रमाणे १२ लाखांपर्यंत प्रवाशांना प्रवासाची परवानगी आहे. सर्व प्रवाशांसाठी लोकल खुली केल्यानंतर या प्रवास नियमाबद्दलही चर्चा होईल, अशी माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

झाले काय?

राज्य सरकारने आता रेल्वे आणि पोलिसांना पत्र पाठवून सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्याबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची विनंती के ली. आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक तसेच रेल्वे पोलीस आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात सर्वसामान्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत सरकार विचार करीत असून त्याबाबत आपली तयारी आहे का, अशी स्पष्ट विचारणा केली आहे.

नियोजन असे..

सर्व प्रवाशांना पहाटे पहिली गाडी सुटल्यापासून ते सकाळी ७.३० वाजेपर्यंत, त्यानंतर  स. ११ वाजल्यापासून सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत आणि रात्री ८ वाजल्यापासून शेवटची लोकल सुटेपर्यंत प्रवासाची मुभा देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना क्यूआरकोड आणि ओळखपत्राच्या आधारे सकाळी ८  वाजल्यापासून १०.३० वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ५ ते ७.३० वाजेपर्यंत प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे.

महिलांसाठी प्रत्येक तासाला स्वतंत्र गाडी सोडण्याचीही रेल्वेची तयारी आहे का, अशी विचारणा करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिली.