सुशीलकुमार शिंदे यांची भीती; देशाची एकाधिकारशाहीकडे वाटचाल चालल्याचे मत
मुंबई : करोना साथरोगाचे अभूतपूर्व संकट आपल्यावर ओढवले आहे. त्याविरोधात सरकार हिमतीने लढत आहे. नागरिकही त्यांना सहकार्य करत आहेत. मात्र, टाळेबंदीचा कालावधी आणखी लांबला तर लोक खाणार काय, हा प्रश्न निर्माण होईल आणि त्यातून कधी उद्रेक होईल, हे सांगता येणार नाही, अशी भीती राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली.
‘टाळ्या वाजवून, भांडी वाजवून, पुष्पवृष्टी करुन, हा प्रश्न सुटणार नाही. एका व्यक्तीचे महत्व वाढविण्याचा हा प्रयत्न असून, देशाची एकाधिकारशाहीकडे वाटचाल सुरू आहे की काय, अशी शंका येते,’ असे परखड मत शिंदे यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या वेबसंवाद कार्यक्रमात व्यक्त केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते केंद्रीय गृहमंत्री अशी अनेक महत्त्वाची पदे सांभाळलेले सुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित या वेबसंवाद मालिकेच्या तिसऱ्या भागात सहभाग घेतला. गेल्या साठ वर्षांतील महाराष्ट्राची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, वैचारिक जडणघडण यांवर भाष्य करतानाच ही सगळी परंपरा सध्या लोप पावत चालली असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर व सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
करोना विषाणूच्या संकटामुळे देशात आणि राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य करताना यातून काही नवे धोके निर्माण होऊ शकतात, असा इशारा त्यांनी दिला. ‘करोनासारख्या साथरोगाचे दु:ख सर्वानाच आहे. सरकार त्याविरोैधात हिमतीने लढत आहे. नवीन साथरोग असल्यामुळे केंद्र सरकारही काहीसे धास्तावले आहे. त्यामुळे टाळेबंदी पुन्हा १५ दिवसांनी वाढवली आहे. ती मे महिन्याच्या अखेपर्यंत किंवा त्याही पुढे वाढू शकते. मात्र, तसे झाल्यास लोकांनी खायचे काय, हा प्रश्न निर्माण होईल. त्यातून कधी उद्रेक होईल हे सांगता येणार नाही,’ अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
करोनामुळे उद्भवलेली परिस्थिती हाताळण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी अप्रत्यक्ष टीका के ली. टाळ्या वाजवून, भांडी वाजवून, दिवे लावून किं वा पुष्पवृष्टी करुन , काही होणार नाही, हा एका व्यक्तीचे महत्व वाढविण्याचा प्रयत्न आहे. यातूनच करोनाच्या आडून या देशात एकाधिकारशाही डोके वर काढते की काय, अशी शंका त्यांनी बोलून दाखविली.
‘साठीचा गझल.’मध्ये आज पृथ्वीराज चव्हाण</strong>
‘साठीचा गझल .. महाराष्ट्राचा’ या वेबसंवाद उपक्रमाच्या चौथ्या भागात आज, सोमवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सहभागी होणार आहेत. सायंकाळी पाच वाजता या वेबसंवादाला सुरुवात होईल. वाचकांना http://tiny.cc/Loksatta-Maharashtra60 या लिंकवर नावनोंदणी करून या वेबसंवादात सहभागी होता येईल व चव्हाण यांना प्रश्नही विचारता येतील.
